पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा; कॉमनवेल्थमध्ये साक्षीला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 02:44 PM2019-07-09T14:44:22+5:302019-07-09T14:45:27+5:30
वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व; पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला
- नीलेश भगत
यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद येथील साक्षी प्रकाश मस्केने आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आफ्रिका खंडातील सामोआ देशात सुरू असलेल्या कॉमनवेल्थ ज्युनियर अँड युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत साक्षीने ४५ किलो वजनगटात रजत पदक पटकावले.
८ जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा पहिलाच दिवस भारतीय संघाने गाजवला. पहिल्या दिवशी भारताने ५ पदके पटकावली. १४ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या २३ खेळाडूंच्या संघाने सहभाग घेतला आहे. त्यात पुसद येथील साक्षी प्रकाश मस्केचाही समावेश आहे. साक्षीने पहिल्याच दिवशी ४५ किलो वजनगटात स्नॅच प्रकारात ५८ किलो तसेच क्लिन एंड जर्क प्रकारात ७२ किलो असे एकूण १३० किलो वजन उचलून भारतासाठी रौप्यपदक पटकावले.
पुसद तालुक्यातील श्रीरामपूर हे साक्षीचे मूळ गाव आहे. तिने पुसदच्या गुणवंतराव देशमुख विद्यालयात आठवी ते अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. सध्या ती पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वीही तिने राज्य स्तरावर एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळविली. तर राष्ट्रीय स्पर्धेतही २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. साक्षीचे वडील केटरिंगचा व्यवसाय करतात. आंतराष्ट्रीय स्तरावरील या यशात प्रशिक्षक विजय शर्मा, उज्ज्वला माने, पुसद येथील आनंद हेल्थ क्लबचे प्रशिक्षक आनंद करडे, गोपाल चव्हाण, गुणवंतराव देशमुख विद्यालयाचे शारीरिक शिक्षक अविनाश कराळे यांचा मोठा वाटा असल्याचे साक्षीने सांगितले.