साकूरला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:22 PM2018-05-30T22:22:17+5:302018-05-30T22:22:26+5:30
तालुक्यातील साकूर गावाला बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास चक्रीवादळाने तडाखा दिला. यात अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील साकूर गावाला बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास चक्रीवादळाने तडाखा दिला. यात अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली.
साकूर येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळ आले. यात संतोष जाधव, बापुराव शिंदे, भगवान जाधव, रहीम भातनासे, सुनील पांडे, नागेश पांडे, मोरेश्वर पाटील, हेमंत जाधव, सुरेश तिळे, रामू तिळे यांच्यासह अनेकांच्या घरावरील टीनाचे छप्पर लोखंडी अँगलसहीत उडून गेले. जवळपास १०० फूट अंतरावर टीनपत्रे उडून गेली.
वादळामुळे अर्धातास गावात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक झाडेही उन्मळून पडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पुसद, पांढरकवडात पाऊस
पुसद तालुक्यात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पांढरकवडा शहरातही विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या शिवाय जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू होता. काही तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही तालुक्यांना वादळाने झोडपले.