पंधरा दिवसांपासून सालईपोड अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:48 AM2021-09-12T04:48:19+5:302021-09-12T04:48:19+5:30
मारेगाव : खंडणी ग्रामपंचायतींतर्गत येणारी सालईपोड ही कोलाम वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे. याबाबत तक्रार देऊनही महावितरण कंपनीचे ...
मारेगाव : खंडणी ग्रामपंचायतींतर्गत येणारी सालईपोड ही कोलाम वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे. याबाबत तक्रार देऊनही महावितरण कंपनीचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तालुक्याच्या एका टोकावर असलेल्या सालईपोड येथे कोलाम समाजाची जवळपास १०० घरांची लोकवस्ती आहे. आज वीज मानवाची जीवनावश्यक गरज बनली असताना या गावातील वीज पुरवठा गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने या कोलाम बांधवांना पावसाळ्याच्या दिवसात विजेविना राहावे लागत आहे. याबाबत गावकऱ्यांनी महावितरणला वारंवार कल्पना देऊनही वीज पुरवठा सुरू होत नसल्याने त्रस्त गावकऱ्यांनी शुक्रवारी वीज कार्यालय गाठून आंदोलन करण्याचा इशारा दिला. गावकरी कार्यालयात धडकताच महावितरणने तत्काळ नवीन ट्रान्सफार्मर गावात नेऊन लावले. परंतु, वृत्त लिहीपर्यंत गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्याचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, यामुळे सालईपोड येथील जळलेला ट्रान्सफार्मर बसवायला थोडा विलंब झाला. शनिवारी नवीन ट्रान्सफार्मर बसवून गावाचा वीज पुरवठा सुरळीत केल्याची माहिती अभियंता गजेंद्र कुरलेवार यांनी ‘लोकमत’ला दिली.