यवतमाळच्या संमेलनात चार कोटींच्या पुस्तकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:46 PM2019-01-15T13:46:22+5:302019-01-15T13:47:41+5:30
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती. यवतमाळच्या संमेलनाने चार कोटींचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे, पुस्तक विक्रेत्यांनाही विक्रमी विक्री होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे अनेक लेखकांची पुस्तके एकदा संपल्यानंतर पुन्हा मिळाली नाहीत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर काही साहित्यिकांनी बहिष्कार टाकल्याने पुस्तकप्रेमी येणार किंवा नाही, असा संशय प्रकाशकांना वाटला. प्रत्यक्षात शेवटच्या दिवसापर्यंत संमेलनस्थळी अलोट गर्दी होती. या गर्दीमधील अनेक अभ्यासू मंडळींनी पुस्तके खरेदी केली. पुस्तक विक्रीचे २१४ स्टॉल या ठिकाणी होते. यामधून चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात २५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
अरुणा ढेरेंच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी
संमेलनात सर्वच प्रकारची पुस्तके विकल्या गेली. विशेषत: संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती. यामध्ये कृष्ण किनारा, प्रेमाकडून प्रेमाकडे, मैत्रही अशी ४० प्रकारची पुस्तके होती. सिंधुताई सपकाळांचे अनाथांची आई नावाचे पुस्तक सर्वाधिक विकले गेले. मृत्यंूजय, छावा, ययाती, ज्ञानेश्वरी, दिव्य पुराण, चार वेद या पुस्तकांसह कादंबºयांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
बाल साहित्याचे स्वतंत्र दालन
ग. दिं. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने साहित्य संमेलनात स्वतंत्र दालन होते. तसेच बाल साहित्याचेही स्वतंत्र दालन होते. त्यामुळे खरेदीत मोठी वाढ नोंदवली गेली. शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षा आणि थोर पुरूषांच्या पुस्तकांनाही संमेलनस्थळी मोठी होती, अशी माहिती ग्रंथप्रदर्शनी समिती प्रमुख सुधीर नारखेडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके संपली
संमेलनस्थळी भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके लवकर संपली. नंतर येणाºया वाचकांना ही पुस्तके मिळाली नाही. या पुस्तकांसाठी अनेक ग्राहकांनी संमेलन पालथे घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पुस्तकांच्या दालनात सर्वाधिक गर्दी होती. चार कोटींची पुस्तके विकली गेली. साहित्य संमेलनात दर्जेदार पुस्तकांचा खजिना असल्याने वाचकांनाही लाभ घेता आला. यवतमाळात नवोदित वाचकांची संख्या वाढत आहे.
- प्रा. घनश्याम दरणे
संमेलन कार्यवाह, यवतमाळ