यवतमाळमधील १० दिवसांच्या मुलीची रायपूरमध्ये अडीच लाखांत विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 10:19 PM2023-03-24T22:19:07+5:302023-03-24T22:19:55+5:30
Yawatmal News समाजमनाला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या आंतरराज्यीय रॅकेटमधील आणखी एका बाळाच्या विक्रीचे प्रकरण समोर आले आहे.
नागपूर : समाजमनाला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या आंतरराज्यीय रॅकेटमधील आणखी एका बाळाच्या विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. आरोपींनी १० दिवसांच्या मुलीची रायपूरमधील एका दाम्पत्याला अडीच लाखांत विक्री केली होती. दत्तकप्रक्रिया पूर्ण करूनच बाळ देणार असल्याची थाप आरोपींनी मारली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदरपासूनच अटकेत असलेल्या आरोपींविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
बाळविक्रीच्या या रॅकेटची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातर्फे चौकशी सुरू आहे. सूत्रधार श्वेता ऊर्फ आयशा खान, सचिन पाटील, मकबूल खान हे अगोदरपासूनच अटकेत आहेत. त्यांच्या चौकशीदरम्यान हे प्रकरण समोर आले. जून २०२२ मध्ये संबंधित विक्री झाली होती. यवतमाळ येथील एका गरीब महिलेला तिसरी मुलगी झाली. याची माहिती सीमा चापरिया या महिलेने आयशाला दिली. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात संबंधित महिलेची प्रसूती झाली होती. सीमाने महिलेला विश्वासात घेऊन बाळ चांगल्या घरात दत्तक देण्यासाठी तयार केले. आयशाने सचिन पाटीलच्या माध्यमातून रायपूर येथील क्रिष्णानी दाम्पत्याला संपर्क केला. संबंधित मुलगी तुमच्याच जातीतील असल्याची बतावणी करत दत्तकप्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन आयशाने दिले. त्यामुळे रायपूर येथील दाम्पत्य पैसे देण्यास तयार झाले. जून २०२२ मध्ये आरोपींनी त्यांच्याकडून पैसे घेऊन १० दिवसांची मुलगी त्यांना सोपविली. या प्रकरणातील तथ्य समोर आल्यानंतर पोलिसांनी आयशा, सचिन, मकबूल व सीमा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बजबळकर, लक्ष्मीछाया तांबुसकर, ज्ञानेश्वर ढोके, राजेंद्र अटकळे, मनीष पराये, सुनील वाकडे, शरीफ शेख, आरती चौहान, ऋषिकेश डुमरे, पल्लवी वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.