एकाच शेत जमिनीची चार जणांना विक्री !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 06:33 PM2024-07-09T18:33:17+5:302024-07-09T18:34:39+5:30
Yavatmal : चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : २१ वर्षांपूर्वी एकच जमीन तीन जणांना व्यवहार करीत विक्री केली होती. त्यानंतर तीच जमीन चौथ्या व्यक्तीस विक्री करण्यात आली. मात्र या व्यक्तीस या व्यवहाराबाबत शंका आल्यानंतर त्यांनी थेट उमरखेड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये एका ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
या प्रकरणातील फिर्यादी विनोद परसराम आलंट यांची बेलखेड शेतशिवारामध्ये शेत सर्व्हे नंबर ६३/२ अही शेती आहे. त्याच्या शेत जमिनीला लागून असलेली शेती सन २००३ पूर्वी अशोक रामराव धोपटे (वय ५२), मारोती रामराव धोपटे (वय ६०), भगवान गंगाराम धोपटे (वय ६२) आणि सुभद्राबाई गंगाराम धोपटे (वय ८०) चौघेही रा. विडूळ ता. उमरखेड यांच्या मालकीची व ताब्यात होती. सदर शेती बाळाजी विठ्ठल शिंदे रा. बेलखेड, तारूसिंग उत्तमसिंग बयास रा. बेलखेड, रमेश आंबाजी फटींग रा. बेलखेड यांना वेगवेगळ्या नोंदणीकृत दस्ताद्वारे विकण्यात आली.
सदर शेत विक्री करताना वरील चारही आरोपींनी खोटे दस्त तयार करून त्याची दुय्यम निबंधक कार्यालय उमरखेड येथे नोंदणी केली आणि शासनाची फसवणूक व दिशाभूल करून शेत विक्री केले. माझ्या शेतावर बाळाजी विठ्ठल शिंदे, तारूसिंग उत्तमसिंग बयास, रमेश आंबाजी फटींग यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्याविरुद्ध विनोद आलट यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिका दाखल करण्यासाठी आलट यांनी २०२३ मध्ये वरील संबंधित खरेदी खताच्या प्रमाणित प्रती दुय्यम निबंधक कार्यालयातून काढल्यानंतर फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर ७ जुलै रोजी विनोद परसराम आलट यांनी लेखी तक्रार दिली.
सखोल चौकशी होणार
उमरखेडचे ठाणेदार संजय सोळंके यांनी भादंवि कलम ४६९/२०४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) ३४ आयपीसी अन्वये चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सदर प्रकरणाचा तपास पोलिस प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, मला उमर- खेडला रुजू होऊन एक वर्ष झाले आहे. हे प्रकरण जुने आहे. त्यामुळे सखोल चौकशी केल्यानंतरच याबाबत बोलता येईल, असे दुय्यम निबंधक, जी. टी. रणमले यांनी सांगितले.