विदर्भात बोगस बीटीच्या १२ लाख पाकिटांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:03 PM2018-02-07T13:03:37+5:302018-02-07T13:05:05+5:30
राऊंडअप (आरआर) अर्थात बोगस बीटी बियाण्यांची २०१७ च्या खरीप हंगामात तब्बल १२ लाख पाकिटांची विक्री झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राऊंडअप (आरआर) अर्थात बोगस बीटी बियाण्यांची २०१७ च्या खरीप हंगामात तब्बल १२ लाख पाकिटांची विक्री झाल्याची माहिती आहे. गुजरातेतून येणारे हे बीटी बियाणे आधी तेलंगणा-आंध्रप्रदेशात नेले जाते. तेथून ते चंद्रपूर मार्गे लगतच्या यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर जिल्ह्यात पुरविले जाते. या बियाण्यांनी कृषी खात्यापुढे आव्हान उभे केले आहे.
राज्यात कपाशीचा पेरा घटला. लागवड क्षेत्रातील कापूस उत्पादनातही ४३ टक्क्याने घट झाल्याचे आकडे कृषी खात्याच्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. यंदा कापसाचे उत्पादन ४५ लाख ६६ हजार २०० गाठींनी (प्रती गाठ १७० किलो कापूस) घटण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. घटत्या उत्पादनासाठी बोंडअळीच्या आक्रमणाला कारणीभूत ठरविले जात असले तरी मुळात बोगस बीटीचा वापर हेसुद्धा प्रमुख कारण ठरले आहे.
राऊंडअप (आरआर) या बोगस बिटी बियाण्यांची गुजरातमध्ये निर्मिती केली जाते. हे बियाणे आधी तेलंगणा, आंध्रच्या सीमावर्ती भागात पाठविले जाते. तेथून त्याचा चंद्रपुरात साठा होतो. त्यानंतर चंद्रपुरातून हे बियाणे लगतच्या यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाठविले जाते. सूत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशी बियाण्याच्या चार लाख पाकिटांची गरज असते. परंतु प्रत्यक्षात तेथे यावेळी १२ लाख पाकिटांची विक्री झाली. दहा लाखांपेक्षा अधिक पाकिटांचा यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूरात पुरवठा केला गेला.
नाराजीमुळे ई-वे बिल लांबणीवर
बोगस बियाण्यांच्या वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी ‘ई-वे बिल’ हा सक्षम पर्याय ठरणार आहे. परंतु आधीच नोटा बंदी, जीएसटी यामुळे भाजपा सरकारविरुद्ध समाज व विशेषत: उद्योजक, व्यापाºयांमध्ये प्रचंड नाराजी वाढत असल्याने ई-वे बिल प्रणालीची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आल्याचे बोलले जाते. या ई-वे बिलमुळे सर्व काही रेकॉर्डवर येणार असून त्याची ट्रान्सपोर्टिंगची वैधता कमाल चार दिवस राहणार असल्याने त्यात गैरप्रकाराला वावच उरणार नसल्याचे मानले जाते.
फवारणी खर्च बचतीचा फंडा
राऊंडअप बिटी बियाण्याच्या किंमतीत नामांकित बियाण्यांच्या तुलनेत फार फरक नाही. मात्र राऊंडअप बिटी बियाणे पेरल्यास तणनाशक फवारण्याची मोकळीक राहते. या फवारणीमुळे बियाणे- रोपटे जळत नाही. फवारणीला हेक्टरी किमान साडेचार हजार रुपये खर्च लागतो. हा खर्च वाचविण्यासाठीच शेतकरी बोगस बीटीला नाईलाजाने का होईना पसंती देतात. कृषी खात्याच्या मूक संमतीने या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली गेली. चंद्रपुरातील हे बोगस बिटी बियाणे विक्रेते कृषी खात्यालाही जुमानत नसल्याचे सांगितले जाते. विशेष असे या बियाण्यांचा हा व्यवहार कुठेच रेकॉर्डवर येत नसल्याने अनेक विक्रेते त्यालाच प्राधान्य देतात.