एकाच दिवशी २७२८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:17 PM2018-09-26T23:17:55+5:302018-09-26T23:19:29+5:30
संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२८ रुग्णांची नोंद करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२८ रुग्णांची नोंद करण्यात आली. उपचारासाठी रांगाच्या रांगा लागल्या. ही आजवरच्या इतिहासातील या महाविद्यालयातील उच्चांकी नोंद मानली जाते.
कॉलरा, स्क्रब टायफस आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरीभागातील मागास वस्त्या आणि विलिन झालेल्या वस्त्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात येत आहे. शहरालगतच्या आठ ग्रामपंचायती यवतमाळ नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या असल्या तरी त्यांची आरोग्य व्यवस्था मात्र ग्रामीण भागातच ठेवण्यात आली आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी पुरेशा सेवा नाहीत. यामुळे सर्व रुग्ण थेट वैद्यकीय महाविद्यालयात धडक देतात. त्यातूनच तेथे दरदिवशी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा आकडा प्रचंड वाढतो. त्यामुळे एका बेडवर तीन रुग्णांना ठेवावे लागत आहे. काहींना वेळप्रसंगी जमिनीवरही उपचार करावे लागत आहे. रुग्णांच्या या गर्दीचा ताण वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधीच तुटपुंजा असलेल्या यंत्रणेवर पडतो. डेंग्यू सदृश आजाराने अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यातील ६५ रुग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंग्यूच्या या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. महाविद्यालयात स्वच्छता व व्यवस्था ठिकठाक असली तरी दुपारी १२ नंतर औषधी वितरण बंद होत असल्याने अनेक रुग्णांना औषधांच्या चिठ्ठ्या घेऊन खासगी मेडिकलमध्ये जावे लागते व त्यासाठी आधी पैशाची तडजोड करावी लागते, अशी ओरड काही रुग्णांमधून ऐकायला मिळाली.
ही आहेत डेंग्यूच्या डासांची पैदास केंद्रे
साठलेल्या स्वच्छ अथवा गढूळ पाण्यात डेंग्यूचे डास निर्माण होतात. ते टाळण्यासाठी साठवलेले पाणी १४ दिवसांच्या आत फेकणे गरजेचे आहे. तरच या डासांची उत्पत्ती थांबविली जाऊ शकते. कचरा कुंडी, कुलर, एसी, फ्रीजच्या मागील भागात साचलेल्या पाण्यात प्रकर्षाने या डासांची उत्पत्ती होते. त्याकरिता किमान एकदा तरी ‘कोरडा दिवस’ पाळणे गरजेचे आहे.
अशी आहेत लक्षणे
ताप येणे, तापामध्ये चढउतार होणे, डोके दुखणे, जॉर्इंटमध्ये(सांधे) दुखणे, चक्कर येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
वैद्यकीय महाविद्यालयात येणाºया रुग्णांचा आकडा वाढत आहे. या ठिकाणच्या सुविधा आणि स्वच्छता यामुळे रुग्णांची पहिली पसंती या दवाखान्याला मिळाली आहे. यंत्रणा साथरोगाला नियंत्रित करण्यात झटत आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.