एकाच दिवशी आठ हजार शिक्षक यवतमाळात
By admin | Published: August 15, 2016 01:21 AM2016-08-15T01:21:17+5:302016-08-15T01:21:17+5:30
जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांना १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात बोलावले आहे.
अविनाश साबापुरे यवतमाळ
जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांना १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात बोलावले आहे. रविवार, स्वातंत्र्यदिन, पतेती, रक्षाबंधन अशा सलग सुट्यांचा हंगाम पाहून पर्यटनाच्या ‘मूड’मध्ये असलेल्या शिक्षकांची या आदेशाने पंचाईत झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील आठ हजार शिक्षक एकाच वेळी येणार असल्याने शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडण्याचीही शक्यता आहे.
शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी १७ आॅगस्ट रोजी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बिंदू नामावलीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मागास प्रवर्गातून नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. सध्या शिक्षकांना सलग सुटीची संधी मिळाली आहे. रविवारची सुटी, लगेच सोमवारी स्वातंत्र्यदिन, त्यानंतर बुधवारी पतेतीची सुटी आणि गुरुवारी रक्षाबंधनाची सुटी अशा सलग सुट्या आल्या आहेत. यात एक दोन दिवस सुटीचा अर्ज टाकून पर्यटनाचे बेत अनेकांनी आखले होते. दरम्यान, बुधवारी १७ आॅगस्ट रोजी सर्वच शिक्षकांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यवतमाळात बोलावण्यात आले. त्यामुळे पर्यटनाचे बेत धुळीस मिळाले आहेत. विशेष म्हणजे, शिक्षकांनी यापूर्वीच जात प्रमाणपत्रे जिल्हा परिषदेकडे जमा केली आहेत. त्यांच्या नियुक्तीपत्राची प्रतही जिल्हा परिषदेकडेच उपलब्ध आहे. मग पुन्हा शिक्षकांना ही कागदपत्रे घेऊन का बोलवले जात आहे, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला. तसेच प्रमाणपत्र पडताळणीची ही प्रक्रिया संबंधित पंचायत समिती स्तरावर करून घेण्याची मागणीही इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनसह विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. मात्र, शिक्षण विभागाचा आदेश निर्गमित झाला असून पडताळणी शिबिरात अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची सेवासमाप्ती करण्याचे निर्देश त्यात नमूद आहेत.