ढाणकी येथील रेती तस्कर अखेर कारागृहात, एमपीडीएअंतर्गत कारवाई
By विशाल सोनटक्के | Published: May 2, 2023 03:04 PM2023-05-02T15:04:58+5:302023-05-02T15:05:41+5:30
बिटरगाव परिसरात सराईत गुंड म्हणून शेख फैयाज शेख रहेमान (४०) याची ओळख असून २०१६ पासून त्याच्यावर बिटरगाव पोलिस ठाण्यात रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे.
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील सराईत गुंड तथा कुख्यात रेती तस्कर शेख फैयाज शेख रहेमान याच्यावर अखेर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याची एक वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेख याच्याविरुद्ध बिटरगाव पोलिस ठाण्यात रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल होते.
बिटरगाव परिसरात सराईत गुंड म्हणून शेख फैयाज शेख रहेमान (४०) याची ओळख असून २०१६ पासून त्याच्यावर बिटरगाव पोलिस ठाण्यात रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे. त्याच्या रेती चोरीमुळे शासकीय महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत होता. तसेच नदी व नाल्याच्या काठावरील नागरिकांनाही तो मोठ्या प्रमाणात त्रास देत होता. त्याच्या या गुन्हेगारीकृत्यामुळे पैनगंगा व परिसरातील जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तो तेच-तेच गुन्हे पुन्हा-पुन्हा करीत असल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यामुळेच त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव बिटरगाव पोलिसांनी पोलिस अधीक्षकामार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार शेख फैयाज शेख रहेमान याला स्थानबद्ध करून त्याची रवानगी एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांनी ही प्रक्रिया पार पाडली.