वाढोणा येथील तलाठ्यावर रेती तस्करांचा हल्ला
By सुरेंद्र राऊत | Updated: December 18, 2024 18:56 IST2024-12-18T18:54:47+5:302024-12-18T18:56:02+5:30
महसूल वर्तुळात खळबळ : वडकी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल

Sand smugglers attack Talathi in Vaddona
सुरेंद्र राऊत /यवतमाळ
वडकी (यवतमाळ) : रेती तस्करांनी तलाठ्याशी हुज्जत घालून जीवघेणा हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे मंगळवारी (दि. १७) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. तलाठ्यावर सध्या सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिलिंद नामदेव लोहत असे जखमी तलाठ्याचे, तर प्रतीक वाढोणकर व इतर दोन, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. तलाठी वाढोणा बाजार येथे कार्यरत आहेत. हल्लेखोरांनी रेती तस्करीच्या वादातून तलाठ्यावर जीवघेणा हल्ला केला. प्रतीक वाढोणकर व अन्य दाेघांनी संगनमत करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अवस्थेतील तलाठ्याला स्थानिक नागरिकांनी राळेगाव येथील रुग्णालयामध्ये आणले. त्यानंतर सेवाग्राम येथे भरती केले. वाढोणा बाजार येथे प्रतीक वाढोणकर व त्याच्या सहकाऱ्यांचा रेतीचा व्यवसाय आहे. तलाठ्याने अवैध रेती उत्खननावर राेख लावण्याचे प्रयत्न केल्यामुळे तस्करांनी हल्ला केल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी वडकी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्व भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१(२), २९६, ३५१(२) ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करून शाेध सुरू केला आहे.
"तलाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे."
- गजानन साखरकर, अध्यक्षा, विदर्भ तलाठी सघंटना, राळेगाव