उमरखेडमध्ये रेती तस्करांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:37 PM2018-11-22T21:37:19+5:302018-11-22T21:37:44+5:30
तालुक्यात रेती तस्करांनी अक्षरशा: हैदोस घातला आहे. प्रशसनाच्या संगनमताने तस्कर रात्रभर रेतीचा उपसा करून दिवसा त्याची बिनबोभाटपणे वाहतूक करीत आहे.
दत्तात्रय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात रेती तस्करांनी अक्षरशा: हैदोस घातला आहे. प्रशसनाच्या संगनमताने तस्कर रात्रभर रेतीचा उपसा करून दिवसा त्याची बिनबोभाटपणे वाहतूक करीत आहे.
तालुक्यातील काही ठरावीक रेती वाहतुकदारांना महसूल प्रशासनाचा वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे संधीचे सोने करण्यासाठी रेती माफियांनी कंबर कसली आहे. साखरा रेती घाटावर रात्रभर रेतीचा उपसा केला जातो. गेल्या आठवड्यापासून या घाटावर वाहनांची रेलचेल आहे. रात्री उपसा केलेली रेती दिवसभर वाहून नेली जाते. ती खुलेआमपणे विकली जाते. मात्र महसूल प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात महसूलशी आर्थिक साटेलोटे करुन रेती तस्कर उपसा करीत आहे. साखरा रेती घाटावर रात्रभर ट्रॅक्टर, टिप्परची वर्दळ वाढली आहे. उपसा केलेली रेती पात्राबाहेरील पंचनामा केलेल्या जुन्या नाममात्र ढिगाºयावर टाकली जाते. नंतर दिवसा पावत्यांचा वापर करून या तस्करीच्या रेतीची विल्हेवाट लावली जाते. हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल अधिकाºयांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महागाव व इतरत्र दूरवर पथक पाठवून काही रेती तस्करांविरुद्ध कारवाई केली. मात्र सत्ता व राजकीय वजनाचा वापर करणाºया येथील रेती तस्करांकडे कानाडोळा चालविला आहे. केवळ नवख्या व भुरट्या तस्कराविरुद्ध कारवाई करून महसूल विभाग धन्यता मानत आहे.
मर्जीतील तस्करांना ‘खुली छूट’
आपल्या मर्जीतील सराईत रेती तस्करांना महसूलने रान मोकळे सोडले आहे. त्यांना एकप्रकारे खुली छूट दिली आहे. महसूलच्या भरारी पथकातीलच काही कर्मचारी वारंवार रेती तस्करांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काही अधिकाऱ्यांनीही तस्करांसोबत ‘मधुर’ संबंध जोपासले आहे. परिणामी तालुक्यातील काही रेती घाटांवर रेती तस्करी चांगलीच वाढली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे. महसूलचे अधिकारी व कर्मचारी मात्र निर्धास्त आहे.