रेती चोरट्यांंना अभय
By admin | Published: July 31, 2016 01:11 AM2016-07-31T01:11:14+5:302016-07-31T01:11:14+5:30
राजाश्रय असलेल्या काही लोकांनी सुरू केलेली रेतीची तस्करी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरत आहे.
केवळ दोघांना दंड : नेर येथे जप्त केली ६०० ब्रास रेती
नेर : राजाश्रय असलेल्या काही लोकांनी सुरू केलेली रेतीची तस्करी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरत आहे. शिवाय प्रशासनाकडूनही अशा लोकांची पाठराखन केली जात आहे. मोठ्या प्रमाणात रेतीचोरी पकडूनही नाममात्र लोकांवर कारवाई केली जाते. प्रत्यक्ष चोरी सापडूनही इतरांना कारवाईपासून दूर ठेवले जाते. असाच प्रकार तालुक्यात घडत आहे.
रेती तस्करी आणि रेतीचे साठे याबाबी तालुक्यात नवीन नाही. पण कारवाई अपवादानेच होते. वरिष्ठांकडून आदेश धडकताच थातूरमातूर कारवाई केली जाते. रेतीची साठवणूक करणाऱ्यांवर किती दंड आकारायचा याविषयी कुठलेही धोरण तालुका महसूल प्रशासनाकडे नाही. शिवाय कारवाईला काही मर्यादाही पाळल्या जात नाही. मागील काही दिवसात रेती चोरी प्रकरणी आठ जणांना पकडण्यात आले. यातील केवळ दोघांना एक लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उर्वरित सहा जणांवर महिना लोटूनही कारवाई झालेली नाही.
तालुक्यात आठ व्यावसायिकांकडून ५९९ ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. परंतु केवळ दोन जणांवर झालेली कारवाई संशयाला जागा निर्माण करून देणारी आहे. तहसीलदार एम.एस. गेडाम, मंडळ अधिकारी एस.डब्ल्यू. जोशी, सुधीर आंबेकर, तलाठी जे.पी. गावंडे, एस.आर. माहुरे यांनी ही कारवाई पार पाडली. खुद्द तहसीलदारांनी कारवाई केलेली असताना दंड करण्यासाठी महिनाभराचा कालावधी कसा लागतो, हा प्रश्न उपस्थित केला जात
आहे.
त्यातही काही लोकांवर झालेली कारवाई केवळ देखावा तर नाही, अशी शंका व्यक्त होत आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)