‘मेडिकल’मध्ये स्वच्छतेचा बोजवारा, दोन हवालदारांनीच पदरी ठेवले चार-चार सहायक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:37 PM2023-11-17T16:37:01+5:302023-11-17T16:40:52+5:30

सफाई करणार कोण : कार्यालयीन कामकाजातच सफाई कामगार व्यस्त

Sanitation burden due to administrative chaos in Vasantrao Naik Government Medical College Yavatmal | ‘मेडिकल’मध्ये स्वच्छतेचा बोजवारा, दोन हवालदारांनीच पदरी ठेवले चार-चार सहायक

‘मेडिकल’मध्ये स्वच्छतेचा बोजवारा, दोन हवालदारांनीच पदरी ठेवले चार-चार सहायक

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय गोंधळामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कारवाईचा देखावा करण्यात आला. पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. आता बिल्डिंग क्र. २ कडे पूर्णत: दुर्लक्ष असून, तिथे घाणीची समस्या गंभीर बनली आहे. याउलट हवालदारांनी स्वत:कडेच प्रत्येकी चार सहायक नियुक्त केले आहे. मनुष्यबळ कमी असताना सफाई कामगाराचा इतरत्र वापर वाढला आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नाही.

रुग्णालयातील दैनंदिन स्वच्छतेकडे थेट नियंत्रण ठेवण्यासाठी हवालदारांची नियुक्ती केली आहे. दोन हवालदार कार्यरत असून, त्यांच्या अधिनस्त एक पूर्ण बिल्डिंगची जबाबदारी दिली आहे. बिल्डिंग क्र. ३ व बिल्डिंग क्र. १ आणि बिल्डिंग क्र. २ अशी ही विभागणी आहे. बिल्डिंग क्र. ३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्यापासून सफाईकडे लक्ष दिले जात आहे. मात्र, बिल्डिंग क्र. २ मध्ये पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

रुग्णालयात १२ तासांत दोन वेळा झाडू, पोछा होणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ सकाळच्या पाळीत ७:३० ते १२ पर्यंत सफाई केल्यानंतर कुणी फिरकत नाही. यामुळे माेठ्या प्रमाणात घाण पसरलेली असते. वाॅर्डातील शौचालय, बाथरूम येथे पाय ठेवणेही शक्य होत नाही. वाॅर्डही २४ तासांतून एकदाच साफ होत असल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.

हवालदारांनी स्वत:कडेच सहायक ठेवल्याने प्रत्यक्ष कामासाठी सफाई कामगार उपलब्ध होत नाही. अनेक जण तर नियमित सफाईसाठी येत नाही. त्यांच्या बदल्यात मुलीला, पत्नीला कामावर पाठवितात. एकूणच या सर्व व्यवस्थेकडे कुणाचे लक्ष नसल्याने गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. वाॅर्डातील कक्षासेवकांच्या भरवश्यावर थोडी बहूत सफाई टिकून आहे. मात्र, कक्ष सेवकाकडे रुग्णांना जेवण वाटणे, ब्लड आणून देणे, बेड लावणे, रुग्णाला ईसीजी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन याकरिता घेऊन जाणे ही सर्व जबाबदारी पार पाडावी लागते. पाच वाॅर्डाला एक कक्षसेवक असल्याने कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही.

या वाॅर्डाकडे कोण पाहणार ?

वाॅर्ड क्र. १२, १३, १४, ७ व ८ याकडे मोठे दुर्लक्ष सुरू आहे. हे वाॅर्ड महत्त्वपूर्ण असून, येथे रुग्णांची वर्दळ असते. त्यानंतरही कामाचे नियोजन केले जात नाही. सफाई कामगारांना कार्यालयीन कामकाजात वापरले जात असल्याने प्रत्यक्ष कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही.

हा घ्या खासगी पॅथॉलॉजीचा पुरावा

रुग्णालयातून गरीब रुग्णांना रक्त तपासणीसाठी खासगी पॅथॉलॉजीचा रस्ता दाखविला जातो. पॅथॉलॉजीचे नाव दिसणार नाही, अशा पद्धतीने तपासणी लिहून दिली जाते. ही कट प्रॅक्टिस आता रुग्णालयात खुलेआम सुरू आहे. याच पद्धतीने स्वत: औषधी दुकानातून गरीब रुग्णांना महागडी औषधी माथी मारली जात आहे.

Web Title: Sanitation burden due to administrative chaos in Vasantrao Naik Government Medical College Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.