सेनेकडून संजय देशमुख तर वंचितकडून सुभाष खेमसिंग पवार मैदानात
By विशाल सोनटक्के | Published: March 27, 2024 01:51 PM2024-03-27T13:51:00+5:302024-03-27T13:52:31+5:30
आता प्रतीक्षा महायुतीच्या उमेदवाराची
विशाल सोनटक्के, यवतमाळ:यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही या निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून वंचितने सुभाष खेमसिंग पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता महायुतीच्या उमेदवारीकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. १९९९ ते २००९ असे तब्बल दहा वर्ष देशमुख यांनी दिग्रस विधानसभेचे नेतृत्व केले आहे. २००९ मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर देशमुख काहीसे बॅकफुटवर आले होते. मात्र तरीही दिग्रसमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचा दबदबा कायम आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख यांनी संजय राठोड यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढताना ७५ हजारांवर मतदान खेचून घेतले होते. उद्धव ठाकरे यांनी नुकताच मतदारसंघात चार ठिकाणी संवाद मेळावा घेतला. या मेळाव्याचे नियोजन देशमुख यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होणार हे जवळपास निश्चित होते. या उमेदवारीवर बुधवारी पक्षाने शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही सुभाष खेमसिंग पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. सुभाष पवार हे दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील असून त्यांनी एमबीए पदवी घेतलेली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून ९३ हजार ९१८ मते मिळविली होती.