'पोस्टल'मध्येही संजय देशमुखांना मताधिक्य; १३ उमेदवारांपेक्षा 'नोटा' सरस
By दिनेश पठाडे | Published: June 5, 2024 05:46 PM2024-06-05T17:46:10+5:302024-06-05T17:47:06+5:30
Yavatmal - Washim Lok Sabha Results 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ५२८० पोस्टल मते
वाशिम :यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे संजय देशमुख यांनी बाजी मारली. ईव्हीएम मतदानामध्ये त्यांनी मताधिक्य घेतलेच;परंतु पोस्टल मतदानामध्ये देखील तेच आघाडीवर राहिली.
लोकसभा मतदारसंघात १२ लाख २५ हजार ५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १२ लाख २० हजार २५० मते ईव्हीएम व ५ हजार २८० मते पोस्टलची होती. पोस्टल मतदान करणाऱ्यांमध्ये दिव्यांग आणि ८५ वर्षे वय झालेले वयोवृद्ध ज्यांनी घरुन मतदानासाठी नोंदणी केली तसेच कर्मचाऱ्यांचा समावेश होता. संजय देशमुख यांनी एकूण ५ लाख ९४ हजार ८०७ मते घेऊन विजय मिळवला. त्यापैकी ५ लाख ९१ हजार ८९९ ईव्हीएम आणि २ हजार ९०८ पोस्टल मताचा समावेश आहे. दुसरीकडे पराभूत उमेदवार राजश्री पाटील यांना एकूण ५ लाख ३३४ मते मिळाली. त्यामध्ये ४ लाख ९८ हजार ९९ मते ही ईव्हीएम व १ हजार ८२० मते पोस्टलच्या माध्यमातून पडलेली आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील पराभूत उमेदवारापेक्षा संजय देशमुख यांना पोस्टलची १ हजार ८८ मते अधिक पडली. त्यावरुन दिव्यांग, वयोवृद्ध आणि कर्मचाऱ्यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पसंती दिल्याचे दिसते.
१३ उमेदवारांपेक्षा नोटाला पोस्टलमध्ये अधिक मते
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत ५ हजार २८० पोस्टल मतदान झाले होते. मोजणीअंती कोणत्या-उमेदवाराला किती पोस्टलचे मतदान झाले हे समोर आले असून उद्धवसेनेचे संजय देशमुख २९०८ मते घेऊन आघाडीवर आहेत. शिंदेसेनच्या राजश्री पाटील यांना १८२० पोस्टल मते पडली. समनक जनता पार्टीचे अनिल राठोड २१५ आणि बहुजन समाज पार्टीचे १४० पोस्टल मते पडली. इतर उर्वरित १३ उमेदवारांना पोस्टल मतदानामध्ये २० आकडा देखील गाठता आला नाही. तर नोटाला ७५ पोस्टल मते पडली. या १३ उमेदवारांपेक्षा पोस्टल मतांमध्ये 'नोटा' सरस ठरले.