संजय राठोड यांची पोहरादेवीत समाजकेंद्रित भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:07 PM2018-12-05T22:07:20+5:302018-12-05T22:07:55+5:30

आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे बंजारा समाजाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील आणि या भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली.

Sanjay Rath has played a pivotal role in the centenarian role | संजय राठोड यांची पोहरादेवीत समाजकेंद्रित भूमिका

संजय राठोड यांची पोहरादेवीत समाजकेंद्रित भूमिका

Next
ठळक मुद्दे२० मागण्या मांडल्या : नंगारा भूमिपूजन सोहळा ठरला देखणा, देशभरातील लाखो बंजारा समाजबांधवांची लाभली उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे बंजारा समाजाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील आणि या भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली. समाजाच्या अनेक प्रश्नांकडे या मान्यवरांचे त्यांनी लक्ष वेधले. एकूणच त्यांची पोहरादेवी येथील देखण्या सोहळ्यातील भूमिका समाज केंद्रित राहिली. प्रास्ताविकातून ना.राठोड यांनी समाजबांधवांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.
ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून पोहरादेवीचा (जि.वाशिम) १२५ कोटींचा विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. त्यापैकी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. उर्वरित १०० कोटी लवकरच मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निधी तत्काळ मंजूर करीत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी केली. ना. राठोड म्हणाले, देशभरातील बंजारा समाज एकच भाषा, एकच वेशभूषा, एकच दैवत व परंपरा मानणारा आहे. देशात विविध नावाने आणि प्रवर्गाने तो ओळखला जातो. महाराष्ट्रात या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. बापट आयोग आणि इदाते आयोगानेही याबाबत शिफारशी केल्या आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. २००४ पूर्वी बंजारा समाजाला नॉन क्रिमिलीयरची तरतूद नव्हती. ती काढून टाकण्याबाबतची फाईल मंत्रालयात पडून असल्याचे सांगून ना. राठोड यांनी याबाबत निर्णय घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांना केला. तांडा सुधार योजनेत वस्ती हा शब्द घुसविला आणि या सुधारणा कागदावरच राहिल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तांड्यांना ग्रामपंचायतीचा निकष बदलल्याने तांड्याचा विकास रखडला, असे ना. राठोड म्हणाले. वसंतराव नाईक महामंडळास कित्येक वर्षांपासून अध्यक्ष नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. समाजाला उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आर्थिक सुधारणांच्या प्रवाहात आणण्याची मागणी ना. राठोड यांनी यावेळी केली. बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना वसतीगृह सुविधा देऊन स्वाधार योजना लागू करावी, शिष्यवृत्ती योजनेसाठी निधी द्यावा, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना द्यावी, आश्रमशाळांचे अनुदान द्यावे अशा मागण्याही मांडल्या. दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी दोन एकर जमीन देण्याबाबत योजना निर्माण करण्याची मागणी ना. राठोड यांनी यावेळी केली. तसेच बंजारा समाज वनविभागाच्या कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याबाबत मोहीम राबवावी, असे आवाहन यावेळी त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केले. गोर बंजारा कलावंतांसाठी मानधन व सवलतीची योजना, गोर बोलीभाषेचा आठव्या सूचीत समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यासोबतच राज्यात उर्दू, सिंधी, गुजराती आदी अकादमीच्या धर्तीवर गोर बंजारा अकादमी स्थापून संस्कृती, कला, भाषा, परंपरा यांच्या संवर्धनसाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली. राज्यातून आणि देशातील विविध भागातून चार लाखांच्या वर बंजारा बांधव या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी माणसांच्या गर्दीचा समुद्र पोहरादेवीत बघायला मिळत असल्याचे जाहीर भाषणात सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ना. संजय राठोड यांचे या कार्यक्रमाच्या आयोजन, नियोजनाबाबत करावे तेवढे कौतूक कमीच आहे, असे गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला कार्यगौरव ना. संजय राठोड यांच्यासाठी भविष्यात यशदायीच ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

Web Title: Sanjay Rath has played a pivotal role in the centenarian role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.