संजय राठोड अखेर अवतरले, दर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 05:00 AM2021-02-24T05:00:00+5:302021-02-24T05:00:02+5:30
मंगळवारी दुपारी १ वाजता वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पत्नीसह पोहरादेवी जि. वाशिम येथे पोहोचले. हजारो समर्थकांच्या गर्दीतून वाट करीत त्यांनी जगदंबा मातेचे मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर, संत बाबनलाल महाराज मंदिर व संत रामराव महाराज समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. गाजत असलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे येथे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी सकाळपासूनच तगडा बंदोबस्त लावला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गेले १५ दिवस ‘नाॅट रिचेबल’ असलेले वनमंत्री संजय राठोड अखेर मंगळवारी पोहरादेवी येथे देवदर्शनासाठी अवतरले. तर मंत्री महोदयांच्या दर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना अक्षरश: लाठीमार करावा लागला. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली.
मंगळवारी दुपारी १ वाजता वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पत्नीसह पोहरादेवी जि. वाशिम येथे पोहोचले. हजारो समर्थकांच्या गर्दीतून वाट करीत त्यांनी जगदंबा मातेचे मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर, संत बाबनलाल महाराज मंदिर व संत रामराव महाराज समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. गाजत असलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे येथे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी सकाळपासूनच तगडा बंदोबस्त लावला होता. जागोजागी तपासणी होत असतानाही ना. राठोड पोहोचण्यापूर्वीच हजारो समर्थक पोहरादेवीच्या वेशीपर्यंत पोहोचले होते. कोरोना टाळण्यासाठी पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला. यात काही कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान पोलिसांनी ना. राठोड यांना दर्शनाच्या ठिकाणी सुखरुप पोहचविले. दर्शनानंतर ना. राठोड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
बदनामी थांबवा- ना. राठोड
मी गायब नव्हतो, तर आई-वडील म्हातारे असल्यामुळे त्यांना व पत्नीला धीर देण्यासाठी बंगल्यावर होतो. आता पोहरादेवीचे दर्शन करून पूर्ववत कामाला लागणार आहे. मागासवर्गीयांचा नेता असल्यामुळे माझ्यावर घाणेरडे आरोप करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे राजकारण केले जात आहे. माझी व समाजाची बदनामी थांबवा, असे आवाहन ना. संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना केले.