राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात वसतेय ‘सांझग्राम’; निराधारांसाठी सहा एकरांत स्वतंत्र गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:00 AM2021-12-08T07:00:00+5:302021-12-08T07:00:03+5:30
Yawatmal News अत्याचारग्रस्त मुलींना अनेक कुटुंबेही स्वीकारत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी एका युवकाने चक्क सहा एकरांत स्वतंत्र गावच वसविण्याचा वसा घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीनजीक हे गाव वसत आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : जग कितीही पुढारले, तरी आजही महिला-मुलींवर घाणेरडे अत्याचार सुरूच आहेत. अशा अत्याचारग्रस्त मुलींना अनेक कुटुंबेही स्वीकारत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी एका युवकाने चक्क सहा एकरांत स्वतंत्र गावच वसविण्याचा वसा घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीनजीक हे गाव वसत आहे.
अत्याचारग्रस्त महिला, मुली, दिव्यांग, वृद्ध अशा सर्वच निराधार व्यक्तींना आधार देणाऱ्या या गावाचे नावही ‘सांझग्राम’ असे अर्थपूर्ण आहे. गावाची पायाभरणी आता २०२१ मध्ये झाली असली, तरी या सेवेच्या व्रताची सुरुवात मात्र २००८ मध्येच अकोला जिल्ह्यातून अमोल मानकर या तरुणाच्या मनात झाली.
झाले असे की, २००८ मध्ये अकोला जिल्ह्यातील एका गावात जात पंचायतीने एका मुलीवर अनन्वित अत्याचार केले. त्यानंतर या मुलीने महिनाभर स्वत:ला घरात कोंडून घेतले. अमोल मानकर यांनी तिला स्वत:च्या घरात आश्रय दिला. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागातील अत्याचारग्रस्त महिला व मुलींनी आधारासाठी अमोल मानकर यांच्याशी संपर्क केला. त्यातूनच मानकर यांनी समविचारी तरुणांची फळी उभी करून ‘समर्पण’ ही संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध १२ ठिकाणी भाडेतत्त्वावर होस्टेल सुरू करून त्यात अत्याचारग्रस्त महिला-मुलींना निवारा दिला.
गेल्या १२ वर्षांत ‘समर्पण’च्या माध्यमातून चार हजार ९०० महिलांना समुपदेशन, तसेच न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला गेला. तर, ९७० महिलांना होस्टेलमध्ये निवारा दिला गेला. २८ अत्याचारग्रस्त मुलींचा सन्मानपूर्वक विवाह लावून दिला गेला.
मात्र, समर्पणच्या होस्टेलमध्ये काही दिवसच या महिलांना ठेवता येते. त्यांना त्यांचे कुटुंब परत मिळावे, समाजात सन्मानाने जगता यावे याकरिता सांझग्रामची संकल्पना पुढे आली. त्यासाठी समर्पणने लोकसहभागातून गुरुकुंज मोझरीजवळ सहा एकर जागा मिळविली. त्यावर गावाची रचना केली जात आहे. त्यात निराधार महिलांसह निराधार वृद्ध, दिव्यांग आदींचीही सोय होणार आहे.
१८ वर्षांवरील ‘कबिरां’नाही सांभाळणार
अनाथाश्रम आणि बालसुधारगृहांमधील बालकांचे वय १८ वर्षांचे झाल्यावर त्यांना तेथे ठेवता येत नाही. यातील बहुतांश मुले वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. अशा मुलांसाठीच अमोल मानकर यांनी ‘कबीर’ ही संज्ञा पुढे आणली आहे. अशा निराधार कबिरांना रोजगार मिळावा, ओळख मिळावी आणि राहण्यासाठी हक्काचे घरही मिळावे म्हणून सांझग्राममध्ये त्यांना ठेवले जाणार आहे.
आप्त, नातेवाईकांनी झिडकारलेल्या महिलांना माहेरपण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना सक्षम करून परत समाजात पाठवितो. मात्र, समाजात पाठविताना उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे या महिलांना पुन्हा गुलामीचे जीवन जगावे लागते. त्यामुळे ‘सांझग्राम’मध्ये कायमस्वरूपी निवारा आणि प्रत्येकाला कामही दिले जाणार आहे.
- अमोल मानकर
संचालक, समर्पण