पिकांना संजीवनी
By admin | Published: September 18, 2015 02:22 AM2015-09-18T02:22:05+5:302015-09-18T02:22:05+5:30
दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी रात्रीपासून धुव्वाधार पावसाला प्रारंभ झाला.
सोयाबीन तारले : कपाशीलाही फायदा
यवतमाळ : दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी रात्रीपासून धुव्वाधार पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत पाऊस कोसळत होता. या पावसाने खरीप पिकांना संजीवनी दिली असून सोयाबीन तरले तर कपाशीला मोठा दिलासा मिळाला आहे. बाप्पांच्या आगमनासोबतच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर गणेश चतुर्थीला हास्य फुलले होते. मात्र पहाटेपासून कोसळणाऱ्या या पावसाने गणेशभक्तांची मात्र थोडी निराशा झाली.
यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील सर्व भागात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. उमरखेडपासून वणीपर्यंत सर्वत्र पावसाचा सारखाच जोर दिसत होता. गुरुवारी सकाळपासूनच पाऊस बरसत होता. कधी रिमझीम तर कधी जोरदार सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ११.७८ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ५८६.२५ मिमी पाऊस कोसळला आहे. केळापूर, वणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. शेंगा पकडण्याच्या काळात पाऊस झाल्याने सोयाबीन पीक तरले आहे. पाऊस आणखी उशिरा आला असता तर सोयाबीन हातचे गेले असते. कपाशी, तूर या पिकांनाही संजीवनी मिळाली आहे. मात्र उडीद आणि मूग या पिकांना फटका बसला आहे. ऐन काढणीच्या काळात पाऊस कोसळला. (कार्यालय प्रतिनिधी)
पारवा-पांढरकवडा मार्ग ठप्प
बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने घाटंजी तालुक्यातील पारवा ते पांढरकवडा मार्ग गुरुवारी सकाळी ठप्प झाला होता. झुली येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे सकाळी ७ वाजतापासून १० वाजेपर्यंत वाहतूक ठप्प होती.
जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड या तालुक्यात गुरुवारी सकाळी ८ वाजतानंतर पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते.
जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनला पावसाची सर्वाधिक गरज होती. शेंगेतील दाणा भरण्यासाठी या पावसाची आता मदत होणार आहे. जिल्ह्यात विक्रमी सोयाबीनचे पीक येण्याचा अंदाज आहे.