गुणवत्तेला मिळाले संस्काराचे पंख
By Admin | Published: June 25, 2017 12:16 AM2017-06-25T00:16:59+5:302017-06-25T00:16:59+5:30
‘लोकमत’मधील ज्ञानवर्धक प्रश्न वाचायचे, उत्तरे द्यायची... मग पाठीवर शाबासकीची थाप आणि चक्क
हवाई सफर : दारव्ह्यातील देवांश खिवसराचा आनंद गगनात मावेना
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : ‘लोकमत’मधील ज्ञानवर्धक प्रश्न वाचायचे, उत्तरे द्यायची... मग पाठीवर शाबासकीची थाप आणि चक्क विमानातून भरारी घेण्याची संधी... राजधानी दिल्लीत मुक्तविहार अन् थेट राष्ट्रपतींची भेट..! वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच विद्यार्थ्यांच्या जीवनात अशी आनंदाची पर्वणी लाभली. ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेतून ही संधी दारव्हा येथील देवांश संदीप खिवसरा या विद्यार्थ्यालाही मिळाली. विमानप्रवासातून नुकताच परतलेला देवांश म्हणाला, दिल्लीदर्शन हवाईसफर अविस्मरणीय होती!
येथील लिटील बर्डस् इंग्लिश मिडियम स्कूलमधील आठवीचा विद्यार्थी देवांश खिवसरा ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेतून विमान प्रवासाचा मानकरी ठरला. वडील अॅड. संदीप खिवसरा, आई सुवर्णा यांनी आनंदाने देवांशला पाठविले.
नागपूरच्या विमानतळावरून सकाळीच देवांश आणि इतर विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत पोहोचल्यानंतर रेल्वे म्युझियम, इंडिया गेट अशा प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. राष्ट्रपती भवनात जाऊन महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रत्यक्ष भेट घडली. उपराष्ट्रपतींकडून भेटवस्तू मिळाल्या. विद्यार्थी भारावून गेले होते. वातानूकुलित बसमधील प्रवास, भोजन, फोटोसेशन सर्वकाही स्वप्नवत होते, असे उद्गार देवांशने काढले. स्पर्धेत गुणवान ठरलेल्या विद्यार्थ्यांना राजधानीचे दर्शन, राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींच्या भेटीतून संस्कारही मिळाले.
जिल्हास्तरावरील विजयातून मिळाली संधी
‘लोकमत’मध्ये खास विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ‘संस्काराचे मोती’ सदर चालविले जाते. देवांश खिवसरा या स्पर्धेत जिल्हास्तरीय विजेता ठरल्यानंतर त्याला लोकमततर्फे दिल्ली हवाई सफर करण्याची संधी मिळाली. ‘‘एवढ्या लहान वयात विमानात बसायला मिळेल याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, ‘लोकमत’ने माझ्या ज्ञानवृद्धीचा यज्ञ सुरू ठेवतानाच हवाई सफरीची संधी दिल्याने आनंद द्विगुणित झाला.’’ अशी प्रतिक्रिया देवांशने व्यक्त केली.