संत रामराव महाराज पंचत्वात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 05:00 AM2020-11-02T05:00:00+5:302020-11-02T05:00:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यावर रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यावर रविवारी श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
उपस्थित अनुयायी, भाविकांनी साश्रुनयनांनी डॉ. रामराव महाराजांचे अंतिम दर्शन घेतले.संत सेवालाल महाराजांचे वंशज असलेल्या तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी रात्री मुंबई येथे देहावसान झाले. त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पोहरादेवी येथे आणण्यात आले.
अंत्यसंस्कारापूर्वी तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव जगदंबा देवी मंदिर व संत सेवालाल महाराज मंदिरात नेण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा मठाच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या अंत्यविधीस्थळी आली. यावेळी उपस्थित अनुयायी, भक्तांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या २१ फैरी झाडून सलामी देण्यात आली. मंत्रोच्चारानंतर परिवारातील सदस्यांनी डॉ. रामराव महाराज यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
यवतमाळच्या अनुयायांचीही धाव
संत डॉ. रामराव महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी यवतमाळ जिल्ह्यातून हजारो अनुयायांनी पोहरादेवी येथे धाव घेतली. खासदार भावना गवळी, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, आमदार तथा माजी राज्यमंत्री मदन येरावार, यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, मखराम पवार यांची अंत्यसंस्कारावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच शनिवारी रात्री महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे आदींनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.