सरपंचावर चोरीचा तर डॉक्टरवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By विलास गावंडे | Published: August 27, 2023 07:37 PM2023-08-27T19:37:57+5:302023-08-27T19:38:05+5:30
वाद मोबाईलवर चित्रिकरणाचा : वडकी पोलिसांनी केली कारवाई
वडकी (यवतमाळ) : घरी येऊन मारहाण करत गळ्यातील सोन्याची साखळी चोरल्याच्या आरोपावरून सरपंचासह त्याच्या भावावर, तर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपावरून डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा कर्मचाऱ्यांसोबत ग्रामपंचायतीत बसलेल्या सरपंचाचे मोबाईलने चित्रिकरण करण्याच्या वादातून हा प्रकार घडला.
प्राप्त माहितीनुसार पळसकुंड-उमरविहीर गटग्रामपंचायतीचे सरपंच वनिश घोसले हे २४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत ग्राम पंचायतीत काही कर्मचाऱ्यांसह बसले होते. बंगाली डॉक्टर मनोरंजन विश्वास यांनी या प्रकाराचे स्वत:च्या मोबाईलवरून चित्रिकरण सुरू केले. या प्रकाराला रोखले असता डॉ. विश्वास यांनी सरपंच घोसले यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सरपंच घोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. विश्वास यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, सरपंच वनिश घोसले यांनी आपल्या घरी येऊन मारहाण केली. गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार डॉ. विश्वास यांनी केली. यावरून वडकी पोलिसांनी सरपंच घोसलेसह त्यांचा भाऊ गणेश घोसले यांच्या विरोधात जबरी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात २५ ऑगस्ट रोजी तक्रारी दाखल करण्यात आल्या. २६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.