सरसंघचालकांनी चुकीचा इतिहास सांगितला; पत्रकार परिषदेत आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:59 IST2024-09-18T17:58:14+5:302024-09-18T17:59:09+5:30
Yavatmal : १८ सप्टेंबरला फुले, शाहू, आंबेडकर संघटनांचे आंदोलन

Sarsanghchalaka told wrong history; Accusations at a press conference
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम शोधून काढली. असे दस्तावेज आहे. महात्मा फुले यांनी स्वतः दिनबंधू अंकात तसे लिहिले. यानंतरही लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. अशी चुकीची माहिती सांगितल्याचा गंभीर आरोप फुले, शाहू, आंबेडकरवादी संघटनांनी केला आहे. बहुजन समाजाच्या खच्चीकरणासाठी हे संघाचे पाऊल असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. याविरोधात आवाज उठवीत १८ सप्टेंबरला महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ निषेध नोंदवीत धरणे दिले जाणार आहे
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यातील कार्यक्रमात छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढल्याचे सांगितले. १८६९ मध्ये प्रथम महात्मा फुले रायगडावर गेले. त्यांनीच समाधीचा शोध लावला आहे. त्यावेळी बाळगंगाधर टिळक १३ वर्षांचे होते. १८८० मध्ये पुण्यात आणि रायगडावर फुलेंनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. १८९३ मध्ये टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिले.
सर्व तज्ज्ञ, इतिहास संशोधक, अभ्यासक, पोलिस खात्यांचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागाराची कागदपत्रे, पुरावे उपलब्ध असतानाही चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. याविरोधात आवाज उठवीत १८ सप्टेंबरला महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ घटनेचा निषेध करीत धरणे आंदोलन होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी अॅड. अरुण मेत्रे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्रदीप वादाफळे, संजय यवतकर, बाळू निवल, सुनयना यवतकर, शशांक केंढे, विलास काळे आदी उपस्थित होते.