पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:47 AM2021-08-21T04:47:33+5:302021-08-21T04:47:33+5:30
मागील दोन वर्षांपूर्वी लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळाला. अनेकांचे बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, नगरपंचायत प्रशासनाने आजपर्यंत शेवटचा हप्ता दिला नाही. ...
मागील दोन वर्षांपूर्वी लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळाला. अनेकांचे बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, नगरपंचायत प्रशासनाने आजपर्यंत शेवटचा हप्ता दिला नाही. लाभार्थींचे दीड ते दोन कोटी रुपये थकले आहेत. सावकारांकडून अनेकांनी व्याजाने पैसे घेऊन आपले घरकूल बांधकाम पूर्ण केले आहे. काहींनी दागिने गहाण ठेवून बांधकाम केले.
यापूर्वी घरकुलाच्या अनुदानाची मागणी घेऊन जानेवारीमध्ये लाभार्थींनी तहसीलसमोर धरणे आंदोलन केले होते. तेव्हा लेखी आश्वासन देऊन निधी वाटप केला जाईल, असे प्रशासनाने कळविले होते. लाभार्थींनी आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींसह म्हाडाकडे पत्रव्यवहार केला. परंतु कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा प्रा. शरदचंद्र डोंगरे, निरंजन नरवाडे, गणेश जयस्वाल, संतोष हुंबे, वासुदेव शेळके, विलास भोयर, गजानन इंगळे, गोविंदा वायकुळे, दत्ता शिरडकर, सुभद्रा कोल्हेकर, गजानन कदम, दिगंबर गाडबैले व अन्य लाभार्थींनी दिला आहे.