खासगी बियाणे कंपन्यांसोबत महामंडळाचे साटेलोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:31 AM2021-05-30T04:31:50+5:302021-05-30T04:31:50+5:30
महागाव : शेतकऱ्यांना कमी भावात बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. परंतु बियाणे महामंडळाने अद्याप कृषी ...
महागाव : शेतकऱ्यांना कमी भावात बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. परंतु बियाणे महामंडळाने अद्याप कृषी निविष्ठांना वितरित केले नाही. त्यामुळे खासगी बियाणे कंपन्यांचे फावत आहे. यामुळे खासगी बियाणे कंपन्या आणि शासनाच्या बियाणे महामंडळाचे साटेलोटे तर नाही ना, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे.
सोयाबीन बियाण्यात खासगी कंपनीने यंदा चांगलीच कमाई केली. महामंडळाच्या सोयाबीन बियाण्याच्या ३० किलोच्या बॅगची किंमत २,२०० ते २,३०० रुपयांपर्यंत आहे. मात्र, महामंडळाने अद्याप वितरकांना बियाणे उपलब्ध करून दिले नाही. परिणामी खासगी कंपनीने तेच वाण २,८०० रुपयांच्यावर विकले आहे. जिल्ह्यातील अनेक दुकानदारांनी मागील तीन महिन्यांपूर्वीच ॲडव्हान्स पेमेंट करून बुकिंग केली होती. तरीही महामंडळाने अद्यापपर्यंत वितरकांना बियाणे का वितरित केले नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
गेल्या वर्षांपासून देशात कोरोनाने अन्नदाता अडचणीत सापडला आहे. आस्मानी व सुलतानी संकट पाचवीलाच पुजलेले आहे. आता खासगी बियाणे कंपन्या आपले बियाणे विकून मोकळे होत आहेत. शासनाच्या बियाणे महामंडळाचे मात्र बियाणे अद्याप विक्रीसाठी दुकानदारांकडे आले नाही. यातून त्यांची ‘अर्थपूर्ण’ मैत्री स्पष्ट होत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
बियाणे महामंडळाने बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठे नियोजन केले होते. परंतु मागील वर्षीच्या परतीच्या पावसामुळे बियाण्याची उगवण शक्ती नापास झाली. त्यामुळे महाबीजला यंदा केवळ १२ हजार क्विंटल बियाणे मिळाल्याची माहिती आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे हित
शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे हित आहे. आमचा व्यवसाय शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही विश्वासार्हता टिकवून ठेवतो. महामंडळाचे बियाणे आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही. रासायनिक खते उपलब्ध आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता शेतकऱ्यांनी शक्य तो घरचे बियाणे उगवणशक्ती तपासून अंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे.
कोट
महाबीज दरवर्षी २७ ते ३० हजार क्विंटल बियाण्याची विक्री करते. मात्र, शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपासाठी आशेवर न राहता घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून लागवड केल्यास कमी खर्चात बजेट बसेल. वितरकांचे बुकिंग आहेत. मात्र, यंदाचे नियोजन नैसर्गिक बाबींमुळे ढेपाळले.
अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ.