शेतकऱ्यांचा जंगलात सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:23 PM2018-04-19T22:23:32+5:302018-04-19T22:23:32+5:30
मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे. खड्डयांसाठी वनविभागाकडून जोर जबरदस्ती केली जात असल्याने वनविभाग व शेतकरी आमने-सामने आले आहेत. मागील १५ दिवसांपासून हा संघर्ष सुरू असला तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिंद्रा येथील आदिवासी व पारंपरिक जमाती वनोजा शिवाराअंतर्गत येत असलेल्या जंगलात शेती करून गुजरान करीत आहेत. वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी सन २००६ साली वनाधिकार कायदा तयार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत, तर न्याय मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी पांढरकवडा जिल्हा सत्र न्यायालयातसुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत. एवढे कायदे व कायद्यानुरूप दावा दाखल केला असतानाही कायद्याचा विरोधात जाऊन वनविभाग खड्डे खणत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
वनविभागाच्या या मोहिमेला विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेचे कॉ.शंकरराव दानव यांच्या नेतृत्वात जंगलामध्ये गेल्या १५ दिवसांपासून शांततेत सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. मात्र वनविभागाने जबरीने कार्यवाही केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने शेतजमीन सोडून पडीत जमिनीवर वृक्षारोपन करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनात किसन मोहुर्ले, श्रीहरी लेनगुरे, सुधाकर सोनटक्के, सुनिता मोहुर्ले, अशोक लेनगुरे, प्रकाश मालेकर, राजहंस बुजाडे, संभा मडावी, तुळशिराम तुमराम, प्रभाकर बावणे, पंचफुला मडावी, लता मालेकर, ताराबाई तुमराम, रूखमाबाई मोहुर्ले, ताराबाई किनाके, शकुंतला लेनगुरे आदी सहभागी झाले आहेत.
आंदोलनाबाबत वनविभाग अनभिज्ञ
गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचा मछिंद्रा शेतशिवारात सत्याग्रह सुरू असताना वनविभाग मात्र या आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील डोल, मछिंद्रा, हिवरा, वनोजा या गावांतील ३४ शेतकरी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात मारेगावचे आरएफओ जगन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे यासंदर्भात मला काहीही माहित नसल्याचे ते म्हणाले.