सावकारांना दत्त चौकातून सात कोटींचा फायनान्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:33 PM2018-02-20T23:33:13+5:302018-02-20T23:33:59+5:30
यवतमाळ शहरातील बाजारपेठेत अवैध सावकारीची पाळेमुळे खोलवर रुजली असून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळी त्याला पाणी घालत असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहरातील बाजारपेठेत अवैध सावकारीची पाळेमुळे खोलवर रुजली असून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळी त्याला पाणी घालत असल्याचे दिसून येते. वैद्यकीय क्षेत्रातील अशाच तीन प्रतिष्ठांनी दत्त चौकातील मध्यस्थामार्फत अवैध सावकारीत तब्बल सात कोटींचे फायनान्स केल्याची माहिती पुढे आली आहे.
यवतमाळात अवैध सावकारी प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यात होत आहे. केवळ व्याजापोटी लाखो रुपयांची देवाणघेवाण होत आहे. ‘तक्रार आल्याशिवाय कारवाई नाही’ या सहकार, महसूल, पोलीस, प्राप्तीकर खात्याच्या भूमिकेमुळे अवैध सावकारीला आणखी फोफावण्यात हातभार लागतो आहे. सावकारांमध्ये उपरोक्त शासकीय विभागांची दहशतच राहिलेली नाही. या विभागाच्या अधिकाºयांना सावकार जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच वरकमाईतील काळा पैसा अवैध सावकारीत गुंतविण्याचा सपाटा सुरु आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तिघांचा असाच एक कारनामा सध्या अवैध सावकारांमध्ये चर्चेत आहेत. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातील तिघांनी दत्त चौकातील एका मध्यस्थामार्फत अवैध सावकारांना सात कोटी रुपये फायनान्स केले आहे. सतत व्यवसाय बदलण्याची सवय लागलेल्या या मध्यस्थाने आपल्याच आजूबाजूच्या गरवंत व्यापाºयांना सावकारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रकमा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पैसे देण्यापूर्वी त्यांच्याकडून कोरे धनादेश घेण्यात आले आहे. या सात कोटींच्या फायनान्सपोटी दरमाह लाखो रुपये व्याज वसूल केले जाते. एकाच चौकातून सात कोटींचा व्यवहार होण्याचे हे जणू प्रातिनिधीक उदाहरण आहे. यवतमाळात अशा पद्धतीने शेकडो कोटींचे फायनान्स अवैध सावकारीत झाल्याचे बोलले जाते.
सर्वच यंत्रणा अनभिज्ञ कशी ?
कोण्या सावकाराला कोण फायनान्स करतो, कोण सावकार कुठे बसतो, कुणाचे व्यवहार कोण पाहतो, कोण सावकार किती टक्के व्याज देते, कोण प्रतिष्ठीत कुणाच्या मध्यस्थीने फायनान्स करतो, कोण सावकार कुण्या गुंतवणूकदार, बिल्डरच्या कनेक्टमध्ये आहे याची इत्यंभूत माहिती शहरातील अनेकांना आहे. मात्र ही माहिती शासनाच्या सहकार, प्राप्तीकर, पोलीस, महसूल व अन्य संबंधित विभागांना असू नये याबाबत आश्चर्य वाटते. हे विभाग या अवैध सावकारीबाबत अनभिज्ञ राहूच शकत नाहीत, त्यांचे लागेबांधे असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दत्त चौकातील मध्यस्थामार्फत गुंतवणूक करणाºया पॅथ-बारचा अनुभव असलेल्या त्या तीन प्रतिष्ठीतांचीही चर्चा अवैध सावकार व वसुलीकर्त्यांमध्ये जोरात सुरू आहे.