मरणाच्या दारात आदिवासी मातेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 AM2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:13+5:30
दुर्दैवाने तिचे बाळ पोटातच दगावले. गंभीर रक्तस्त्राव सुरू झाला. हिमोग्लोबीन फक्त चार ग्राम असल्याने सिझेरियनही शक्य नव्हते. डॉक्टरांनी तिला ‘सिव्हीअर अनेमिया विथ लो लायिंग प्लासेंटा विथ इंट्रा युटेरस डेथ विथ सिकलसेल’ असे निदान सांगितले. मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आता तिचा प्राण वाचविणे शक्य नसल्याची बाब वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर राठोड यांच्या लक्षात आली.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासी पोडावरची मजूरदार गरोदर महिला अत्यवस्थ झाली. पोटातले बाळ पोटातच दगावले. पोटात रक्तस्त्राव झाला... त्यात आॅपरेशन करावे तर महिलेला सिकलसेल झालेला.. वाचण्याची अजिबात शक्यताच नाही.. डॉक्टरांनी हात टेकले... आता मरणाशिवाय पर्याय नाही... पण तरीही ती वाचली.. नव्हे तिला वाचविले.. कोणी? कसे?
ही मृत्यूच्या दाढेतून गरीब महिलेला परत आणण्याची ही यशकथा एखाद्या चकाचक खासगी रुग्णालयाची नव्हे, तर सरकारी दवाखान्यात माणुसकी जपणाऱ्या स्टाफच्या धावपळीने हा जीव वाचला.
ही कहाणी थोडक्यात अशी आहे... कळंब तालुक्यातील उमरगाव या पोडावर राहणारी ललिता चांदेकर ही रोजमजुरीवर जगणारी महिला सात महिन्यांची गर्भवती होती. पण दुर्दैवाने तिचे बाळ पोटातच दगावले. गंभीर रक्तस्त्राव सुरू झाला. हिमोग्लोबीन फक्त चार ग्राम असल्याने सिझेरियनही शक्य नव्हते. डॉक्टरांनी तिला ‘सिव्हीअर अनेमिया विथ लो लायिंग प्लासेंटा विथ इंट्रा युटेरस डेथ विथ सिकलसेल’ असे निदान सांगितले. मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आता तिचा प्राण वाचविणे शक्य नसल्याची बाब वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर राठोड यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकोलकर यांना संपर्क करून पर्यवेक्षक आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक मनोज पवार आणि आरोग्यसेविका भारती ठोंबरे यांच्यासोबत ललिता चांदेकर हिला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले.
रात्रीचे १२ वाजले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संदर्भसेवेत दाखल झालेला हा रुग्ण वाचणे शक्यच नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. कारण रक्तस्त्राव सतत चालू होता. ललिताचा एचबी फक्त ३ असल्याने पोटातील बाळ सिझर करून काढणे अशक्य होते. कोणत्याही क्षणी मातामृत्यू अटळ असल्याचे सांगण्यात आले. आता मोठ्या प्रमाणात रक्तसंक्रमण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. रोहीदास चव्हाण यांनी स्पष्ट केले. पण एवढ्या रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त कसे मिळणार? रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या लाईफ सेविंगमध्येही एबी पॉझिटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
लगेच मनोज पवार आणि भारती ठोंबरे यांनी सर्व जबाबदारी स्वीकारली. काय लागते ते सांगा, आम्ही व्यवस्था करू, तुम्ही उपचार सुरू ठेवा असे डॉक्टरांना आश्वस्त केले. लगेच संकल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून रक्ताचे जमवाजमव सुरू झाली. तब्बल आठ बॉटल रक्त, प्लाझमा आणि अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे एवढ्या रात्री बाहेर जाऊन खासगी रुग्णालयातून रक्ताच्या विविध तपासण्याही करून आणल्या आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ललिताच्या पोटातून प्लासेन्टा (नाळ, गर्भ) काढला गेला.
डॉ. रोहिदास चव्हाण यांच्यासह त्यांच्या टीममधील डॉ. सुषमा गोरे, डॉ. अंशुल, डॉ. विशाखा कोंडेवार, डॉ. अनुजा भवरे, डॉ. एकता लिल्हारे, डॉ. मरियम मोठीवाला, डॉ. स्नेहल भगत, डॉ. किरण भगत, डॉ. समीर मेश्राम, डॉ. गोविंद बागडिया, डॉ. आदित्य भाईया, डॉ. श्रुती भवरे, डॉ. कुणिका भानोरकर, आरोग्य सेविका भारती ठोंबरे, राऊत, नेहारे, राज्यस्तरीय प्रशिक्षक मनोज पवार आदींची मेहनत फलद्रूप झाली.
वर्षभरातील ३० मातामृत्यूंचा जाब कोण विचारणार ?
महाराष्ट्रात दरवर्षी एक लाख प्रसूतींमागे ६० मातामृत्यूचे प्रमाण आहे. आदिवासी भागात मृत्यूचा हा आकडा शंभरपर्यंत जातो. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४९ हजार बाळंतपणे झाली. त्यात ३० मातामृत्यू झाले. दुर्गम आदिवासी गावे, पोडांवरील गर्भवती मातांना वाचविताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. मेटीखेडा आरोग्य केंद्रांतर्गत ही काळजी घेतली जात आहे. या केंद्राने मातामृत्यूचा दर शून्य टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. उमरगावच्या महिलेला वाचवून ते सिद्धही केले. याबाबत सांगताना पर्यवेक्षक व राज्यस्तरीय प्रशिक्षक मनोज पवार म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अशा महिलांसाठी अनेक सुविधा आहेत. त्यांचा उपयोग केला जातो का याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३० मातामृत्यूंच्या वार्षिक आॅडिटमध्ये घेण्याची गरज आहे.
आदिवासी पोडावरील या महिलेचे बाळ पोटातच दगावल्याने आणि सतत रक्तस्त्राव सुरू असल्याने त्यातच हिमोग्लोबीन फक्त ४ ग्रॅम असल्याने सिझरीन शक्य नव्हते. या महिलेची जगण्याची शक्यता ९९ टक्के नव्हतीच. मात्र वेळीच रक्तसंक्रमण व्यवस्था, फिजीशियन, गायनॉकॉलॉजीस्ट सोबत सतत पाठपुरावा आणि कर्मचाऱ्यांची धावपळ यामुळे यश मिळाले.
- डॉ. दिगंबर राठोड
वैद्यकीय अधिकारी, मेटीखेडा.
ही पेशंट दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होती. पहिलेही बाळ दगावले होते. आता दुसरे तर पोटातच दगावले. सिझर करून ते बाळ काढणे हाच पर्याय होता. पण तिच्या अंगात केवळ ३ ग्रॅम रक्त होते. वार खाली होता. पॉयझन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू एक्सपेक्टेडच असतो. मात्र आम्ही निर्णय घेतला, रक्ताची सोय केली. पण त्यातच तिचा बीपी खालावत होता. किडनी फेल होण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर आणखी तीन दिवस वेगवेगळे उपचार सुरू ठेवले. टीम वर्कचे हे यश आहे.
- डॉ. रोहिदास चव्हाण, स्त्रीरोग विभाग प्रमुख, मेडिकल, यवतमाळ.