छकुलीला वाचविताना आई बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:24 PM2018-10-07T22:24:51+5:302018-10-07T22:28:58+5:30
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानव निर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. रेखा उर्फ कालिंदा देवेंद्र पेंद्राम (४०) रा. वाढोणा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणाबाजार : राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानव निर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली.
रेखा उर्फ कालिंदा देवेंद्र पेंद्राम (४०) रा. वाढोणा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी घरातील कामे आटोपून कालिंदा आपली मुलगी छकुली (१५) हिच्यासह धुणे धुण्यासाठी एका महाविद्यालयामागील मानव निर्मित तलावावर गेल्या होत्या. धुणे धुत असताना अचानक छकुलीचा तोल गेल्याने ती पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी कालिंदाने पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत मुलगी छकुलीने आरडाओरडा केल्याने परिसरात असलेल्या लक्ष्मण निमसटकर या तरुणाने घटनास्थळी धाव घेतली. त्याने पाण्यात उडी मारुन छकुलीला बाहेर काढले. तोपर्यंत कालिंदा पाण्यात बुडाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला.
वाढोणा बाजार येथे एका महाविद्यालयामागे कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्ता बांधणाऱ्या बांधकाम कंपनीने मुरुमासाठी उत्खनन केले. या उत्खननामुळे तेथे तलाव सदृश मोठा खड्डा निर्माण झाला. यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. गावातील अनेक महिला याच तलावावर धुणे धुण्यासाठी जातात. त्यातूनच रविवारी ही घटना घडली. त्यामुळे रस्ता बांधकाम कंपनीविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेची नागरिकांनी वडकी पोलिसांना माहिती दिली. संतप्त नागरिकांनी बांधकाम कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल होतपर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.