ढाणकीच्या सविता तोटेवाड यांना सर्वाधिक मताधिक्य
By admin | Published: February 27, 2017 12:57 AM2017-02-27T00:57:27+5:302017-02-27T00:57:27+5:30
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ढाणकी गटाच्या उमेदवार सविता सचिन तोटेवाड या जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या आहे.
जिल्हा परिषद : ३१८९ मतांनी केली मात
ढाणकी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ढाणकी गटाच्या उमेदवार सविता सचिन तोटेवाड या जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ३१८९ मतांची मात करीत विजय मिळविला आहे.
ढाणकी जिल्हा परिषदेच्या गटात तिरंगी लढत झाली. सविता तोटेवाड या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांनी भाजपाच्या उमेदवार शोभाताई गरुडे व शिवसेनेच्या उमेदवार प्रियंका कुसरे यांना पराभूत केले. सविता तोटेवाड यांना सात हजार ६४६ मते मिळाली. जिल्ह्यात सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून येण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. त्याच बरोबर ढाणकी गणात राष्ट्रवादीच्या कमल पराते व ब्राम्हणगाव गणात काँग्रेसचे नयन पुद्दलवार विजयी झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजपा घोंगावत असताना या गटाने व गणाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलासा दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभूत व्हावे लागले. तर दुसरीकडे काही उमेदवारांचा निसटता विजय झाला. मात्र सविता तोटेवाड यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा मान पटकाविला. (वार्ताहर)