बचतगटाच्या महिला होणार ‘इंटरनेट साथी’
By admin | Published: March 1, 2017 01:23 AM2017-03-01T01:23:08+5:302017-03-01T01:23:08+5:30
स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण विश्व एका क्लिकवर आले आहे. माहितीचे हे नवीन तंत्रज्ञान गाव,
टॅब आणि मोबाईलची भेट : २४ तास मोफत इंटरनेट, कॅशलेस व्यवहार शिकविणार
रूपेश उत्तरवार यवतमाळ
स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण विश्व एका क्लिकवर आले आहे. माहितीचे हे नवीन तंत्रज्ञान गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पोहोचावे म्हणून बचतगटाच्या महिलांना ‘इंटरनेट साथी’ बनविण्यात येत आहे. त्यासाठी गुगल इंडिया, टाटा ट्रस्ट आणि महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिलांना स्मार्ट फोन आणि टॅब मोफत वितरित केले आहे.
डिजिटल इंडियाची संकल्पना गावागावात रूजविण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून पावले उचलण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सर्वसामान्य महिलांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याची धुरा महिला बचतगटांवर सोपविण्यात आली आहे. ‘इंटरनेट साथी’ म्हणून त्या गावपातळीवर काम करणार आहे. या कामात गुगल कंपनी पुढे आली आहे. टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही मोहीम गावपातळीवर राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बचतगटाच्या ७२ महिलांची ‘इंटरनेट साथी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेल्या महिलांना टॅब आणि स्मार्ट फोन मोफत देण्यात आला आहे. या मोबाईलच्या सिमवर २४ तास इंटरनेट सुविधा मोफत राहणार आहे. संपूर्ण कामकाज महिलांना हाताळता यावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
कॅशलेस व्यवहार कसा करायचा, इंटरनेटद्वारे माहिती कशी गोळा करायची, नोकरीच्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत, त्याकरिता अर्ज कुठे भरायचे, शासनाच्या कुठल्या योजना आहेत, कृषी क्षेत्रात नवीन बदल झाले आहेत का, विविध तंत्रज्ञान आदी माहिती देण्यात येणार आहे.
एका ‘इंटरनेट साथी’ महिलेला एका महिन्यात २५० महिलांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या महिला गावपातळीवर जाणीवजागृतीचे काम करीत आहे. आतापर्यंत १५ हजार महिलांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम महिलांनी केले आहे. ई-मेल आयडी तयार करण्याचे कामही महिलांनी सुरू केले आहे.