बँक खात्यांतून सव्वादोन लाख उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:07 PM2019-05-06T22:07:28+5:302019-05-06T22:07:45+5:30
बनावट एटीएमचा अथवा अन्य तंत्राचा वापर करून अज्ञात भामट्यांनी वणीतील तीन ग्राहकांच्या स्टेट बँकेतील खात्यातून दोन लाख १७ हजार रूपये उडविल्याची घटना उजेडात आली आहे. या तिनही ग्राहकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. संबंधित बँकेने मात्र याविषयात हातवर करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बनावट एटीएमचा अथवा अन्य तंत्राचा वापर करून अज्ञात भामट्यांनी वणीतील तीन ग्राहकांच्या स्टेट बँकेतील खात्यातून दोन लाख १७ हजार रूपये उडविल्याची घटना उजेडात आली आहे. या तिनही ग्राहकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. संबंधित बँकेने मात्र याविषयात हातवर करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
वणी शहरातील प्रगतीनगर भागातील रहिवासी शेख निसार शेख महेबूब (५३) यांचे वणीतील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. शेख निसार हे वेकोलिच्या वाहनावर खासगी चालक म्हणून काम करतात. त्यांनी पै-पै करून पुंजी जमविली आणि ही रक्कम सुरक्षित राहावी म्हणून स्टेट बँकेच्या स्वत:च्या खात्यात जमा केली. मात्र २ ते ४ मे या तीन दिवसांच्या कालावधीत त्यांच्या खात्यातून जवळपास एक लाख ४० हजार रूपये उडविण्यात आले. बनावट एटीएमचा वापर करून ही रक्कम उडविण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. २ मे रोजी ४० हजार रूपये, ३ मे रोजी ४० हजार रूपये, ४ मे रोजी वेगवेगळ्या वेळात दोनदा १० हजार व एकदा ४० हजार, अशा प्रकारे रक्कम अज्ञात भामट्यांनी उडविली. ही बाब लक्षात आल्यानंतर शेख निसार यांनी यासंदर्भात बँकेला विचारणा केली असता, बँकेकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि ४२० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार ६६ (सी.) अन्वये गुन्हा दाखल केला.
यासोबतच २ मे रोजीच वणी शहरातील रत्ना संजय लडके या महिलेच्या खात्यातून सात हजार रूपये अज्ञात भामट्यांनी उडविले. त्यांनीदेखील वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच कडूकार नामक व्यक्तीच्या खात्यातूनही ७० हजार रूपये उडविण्यात आले आहे. त्यांनीदेखील पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यात बँक खात्यातून रक्कम उडविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. २८ जानेवारी रोजी नांदेपेरा येथील एका युवा शेतकऱ्याच्या खात्यातून ३१ हजार रूपयांची रक्कम उडविण्यात आली होती.
तसेच त्याच महिन्यात जयश्री भोयर नामक महिलेच्याही खात्यातून जवळपास २४ हजार रूपये अज्ञात भामट्यांनी उडविले होते. या दोनही घटनेच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. मात्र त्यातून अद्यापतरी काहीही निष्पन्न झाले नाही. रक्कम सुरक्षित राहावी म्हणून सामान्य माणुस बँक खात्यात पैसे जमा करतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून घडणाºया या घटनांमुळे ग्राहकांच्या खात्यातील पैसे खरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न या घटनांनी निर्माण झाला आहे.
स्टेट बँकेतील ग्राहकांची संख्या मोठी असून बँकेची शाखादेखील देशभर आहे. ही बँक ग्राहकांना कधीही एटीएमचा कोड विचारत नाही अथवा त्यासंदर्भात कोणतीही माहिती घेत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अज्ञात व्यक्तीला आपल्या एटीएमसंदर्भात कोणतीही माहिती देऊ नये. एटीएममधून रक्कम काढल्यानंतर कॅन्सलचे बटण दाबावे.
डी.एस.धकाते,
प्रभारी व्यवस्थापक स्टेट बँक, वणी.