सवनाच्या लक्ष्मीची रेशीम उद्योगात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:36 PM2019-03-02T23:36:34+5:302019-03-02T23:36:58+5:30
पारंपारिक शेतीला फाटा देत रणरागिणीने आधी गुलाब शेती फुलविली. आता विविध सकटांवर मात करीत त्यांनी चक्क रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळविला. पुरुष शेतकऱ्यांना लाजवेल, असे काम करून या महिला शेतकऱ्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला.
संजय भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : पारंपारिक शेतीला फाटा देत रणरागिणीने आधी गुलाब शेती फुलविली. आता विविध सकटांवर मात करीत त्यांनी चक्क रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळविला. पुरुष शेतकऱ्यांना लाजवेल, असे काम करून या महिला शेतकऱ्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला.
लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर, असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील सवना येथे त्यांची शेती आहे. गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी धड रस्ता नाही. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात जाताना सतत वन्यप्राण्यांची भीती असते. मात्र या संकटांना लक्ष्मीबाई डगमगल्या नाही. उलट त्यांनी संकटांचा सामना करीत पारंपारीत शेतीला फाटा दिला. पहिल्यांदा शेतात गुलाबाची लागवड केली. त्याला यश येताच केळीची बाग फुलविली. सोबतच ऊसाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली.
तालुक्यात गुलाबाची शेती करणाऱ्या महिला म्हणून त्या नावारुपास आल्या. अनेक कृषी प्रदर्शनात त्यांच्या शेतातील गुलाबाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची मेहनत दिसून आली. परिणामी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. राज्य शासनानेसुद्धा त्यांच्या परिश्रमाची दखल घेत सन्मानित केले. मात्र कोणत्याही सन्मानाने लक्ष्मीबाई हुरळून गेल्या नाही. उलट नव्या जोमाने त्यांनी शेतीत नवीन प्रयोग सुरू केले. नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी थांबविले नाही. यातूनच आता त्यांनी रेशीम उद्योगाकडे आपला मोर्चा वळविला आहे. आता त्यांनी शेतात रेशीम लागवड करून त्यापासून उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातीलच एका महिलेने शेतीत नवनवे प्रयोग करून आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांसाठी लक्ष्मीबाई प्रेरणदायी ठरल्या आहेत. आता त्या दर रविवारी इतर शेतकºयांच्या शेतात पोहोचून त्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. यातून शेतकºयांना नवी उभारी मिळत आहे.
शासन, प्रशासनाचा कोडगेपणा कायमच
लक्ष्मीबाई पारवेकर यांचे शेत डोंगराळ भागात गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. शेतात जायला धड रस्ता नाही. रस्त्यासाठी अनेकदा त्यांनी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन आणि प्रशासनाचा कोडगेपणा अद्याप कायम आहे. तरीही न डगमगता लक्ष्मीबाईने शेती कसली. जिद्दीने गुलाब फुलविला. आता रेशीम शेती सुरु केली. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्या प्रेरणा देत आहे. समाजकारण आणि राजकारणातही त्यांचा वावर आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांसाठी त्या प्रेरणादूत ठरल्या असताना शासन आणि प्रशासन मात्र शेतात जाण्यासाठी धड रस्ता तयार करून देण्यास तयार नाही. पालकमंत्री पांदण रस्त्याचे भयावह वास्तवही यातून अधोरेखीत होत आहे.