सांगा मोदी साहेब, आम्ही जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:23 PM2019-02-16T22:23:58+5:302019-02-16T22:24:16+5:30
शासकीय धोरणामुळे भुकेचा भीषण प्रश्न निर्माण झाला. मोदी साहेब, सांगा आता आम्ही जगायचे कसे, असा जीवन मरणाचा प्रश्न घेऊन जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा ते पांढरकवडा अशी पदयात्रा काढली.
नरेश मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा (यवतमाळ) : शासकीय धोरणामुळे भुकेचा भीषण प्रश्न निर्माण झाला. मोदी साहेब, सांगा आता आम्ही जगायचे कसे, असा जीवन मरणाचा प्रश्न घेऊन जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा ते पांढरकवडा अशी पदयात्रा काढली. पंतप्रधानांना भेटून आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मात्र सफल झाला नाही.
शनिवारी पांढरकवडा येथे महिला बचतगटांचा महामेळावा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेळाव्यासाठी आले होते. या पार्श्वभूमीवर पारधी समाज संघटनेचे राज्याध्यक्ष मतिन भोसले यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथून शुक्रवारी पांढरकवडापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जिल्ह्यातील चारशेवर समाजबांधव सहभागी झाले होते. शासनाने शिकारीवर बंदी आणल्याने पारधी समाज बांधवांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शिकारीला परवानगी देण्यात यावी, शिकारी बंद झाल्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून पोटाची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाने त्या जमिनीही हिसकावून घेतल्या. आता आम्ही जगायचे कसे, असा या पारधी बांधवांचा सवाल आहे. शासनाने शिकारीची परवानगी द्यावी किंवा अतिक्रमणाची हिसकावून घेतलेली शेती परत करावी, अशी या समाजबांधवांची मागणी आहे.
शनिवारी मेळावा सुरू होण्यापूर्वी मजल दरमजल करीत पदयात्रेद्वारे पारधी समाज बांधव कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी सभास्थळी जाण्यास त्यांना मज्जाव केला. सभा होईस्तोवर हे समाजबांधव ताटकळत कार्यक्रमस्थळाच्या काही अंतरावर दूर उभे होते. आम्हाला मोदी साहेबांना भेटू द्या, अशी आर्जव ते पोलिसांना करीत होते. मात्र, शेवटपर्यंत त्यांना अडवून धरण्यात आले. मेळावा संपल्यानंतर मतिन भोसले व पारधी समाजबांधवांनी पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगितली. ना. येरावार यांनी दोन दिवसानंतर यवतमाळला भेटून चर्चा करू, असे आश्वासन दिले.