म्हणे, २५ रुपयांत चौरस आहार
By admin | Published: December 23, 2015 03:11 AM2015-12-23T03:11:55+5:302015-12-23T03:11:55+5:30
चपाती, भात, कडधान्य, डाळ, शेंगदाणा लाडू, केळी, अंडी, हिरव्या पालेभाज्या असे चौरस भोजन तेही २५ रुपयांत. विश्वास बसत नाही ना. पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल.
‘अमृत’ आहार योजना : राज्य शासनाचा जावई शोध, गरोदर व स्तनदा माता
रूपेश उत्तरवार यवतमाळ
चपाती, भात, कडधान्य, डाळ, शेंगदाणा लाडू, केळी, अंडी, हिरव्या पालेभाज्या असे चौरस भोजन तेही २५ रुपयांत. विश्वास बसत नाही ना. पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. राज्य शासनाच्या अमृत योजनेत गरोदर आणि स्तनदा मातांना अवघ्या २५ रुपयांतच चौरस भोजन देण्याचा जावई शोध लावला आहे. महागाईच्या काळात अल्प पैशात या योजनेतून भोजन तयार करण्याची कसरत मात्र संबंधित यंत्रणेला करावी लागणार आहे.
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर आणि स्तनदा मातांना एकवेळ चौरस आहार देण्याची घोषणा राज्य शासनाने सुरू केली. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजना असे या योजनेचे नाव आहे. १ डिसेंबरपासून ही योजना आदिवासी विकास विभागाने अमलात आणली आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी ही योजना आहे. योजना राबविण्यामागे उदात्त हेतू असला तरी यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद या योजनेतील मोठा खोडा ठरणार आहे. योजनेत सूचविण्यात आलेल्या तरतुदी आणि सध्याच्या विविध वस्तूंचे दर यात मोठी तफावत आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे.
या योजनेतून अन्न घटक निहाय, उष्मांक, प्रथीने, मेद आणि लोहयुक्त चौरस आहार देण्याच्या सूचना आहे. एका दिवसाला यातून ९१० कॅलरीज निर्माण होणार आहे. यामध्ये चपाती, तांदूळ, कडधान्य, डाळ, सोयादूध, शेंगदाणा लाडू, केळी, अंडी, नाचणीचा हलवा, पालेभाज्या, खाद्य तेल, आयोडिनयुक्त मीठ, मसाला आदींचा समावेश आहे.
या सर्व वस्तूंसाठी शासनाने केवळ २५ रुपयांची तरतूद केली आहे. सध्या गहू साधारणत: २० रुपये किलो आहे. यातून चपातीसाठी केवळ २.२५ पैशाची तरतूद करण्यात आली आहे. तांदूळ ४० रुपये किलो असले तरी त्यासाठी चपाती एवढेच पैसे दिले जातील. डाळीने सर्वांचे डोळे पांढरे केले असले तरी या योजनेत डाळीसाठी ३ रुपये ठेवण्यात आले आहे. यासोबतच अंडी, केळी, नाचणी आदींसाठी पाच रुपयांची तरतूद आहे. हिरव्या पालेभाज्यांचे दर ४० रुपये किलोच्या घरात असताना त्यासाठी ३.५० पैसे तर तेलासाठी केवळ २ रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढा आहार तयार करण्यासाठी इंधन म्हणून केवळ दोन रुपये. आता अशा परिस्थितीत २५ रुपयात जेवण तयार करायचे कसे आणि ते गरोदर आणि स्तनदा मातांना द्यायचे कसे असा प्रश्न आहे.