दाखल खारीज रजिस्टरचे स्कॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:55 AM2017-07-20T00:55:40+5:302017-07-20T00:55:40+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील दाखल खारीज रजिस्टरचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतला.
शिक्षणचा निर्णय : विद्यार्थ्यांच्या झिरो बॅलन्स खात्याचा वांदा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांमधील दाखल खारीज रजिस्टरचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतला. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत समितीने प्रस्ताव पाठविला आहे.
शिक्षण सभापती नंदिनी दत्तकुमार दरणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शिक्षण समितीची बैठक झाली. या बैठकीत सर्व शाळांमधील दाखल खारीज रजिस्टरचे स्कॅनिंग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हे रजिस्टर अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकांना त्याच्या प्रतीची अनेक वर्षांनंतर गरज भासते. विशेषत: अनेकांना चौथी आणि सातवीच्या दाखल्याची पुढे गरज पडते. मात्र शाळांमधील दाखल खारीज रजिस्टर अत्यंत जीर्ण झाल्याने अनेकदा जन्माचा दाखला देताना अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी आता हे रजिस्टर स्कॅनिंग करून जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सेवानिवृत्त ६१७ शिक्षकांना सहा महिन्यांच्या आंत वरिष्ठश्रेणी, निवडश्रेणीचे लाभ देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र अद्याप या सेवानिवृत्तांना थकबाकीही मिळाली नाही, असा प्रश्न स्वाती येंडे यांनी उपस्थित केला. त्यावर शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी येत्या १५ दिवसांत त्यांची प्रकरणे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही दिली. या सर्व सेवानिवृत्तांना १५ दिवसांत थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शासनाने नवीन आदेशानुसार पालक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात गणवेशाचा निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यात हा निधी जमा करण्याचा निर्णय होता. नवीन निर्णयाने हा निधी अद्याप तसाच पडून आहे. त्यात काही बँकांनी अशा खात्यात कमीत कमी ५०० ते हजार रूपये जमा ठेवण्याचे आदेश दिले. ४०० रूपयांच्या निधीसाठी एवढी रक्कम जमा ठेवणे अशक्य असल्याने विद्यार्थ्यांच्याच सिंगल अकाउन्टमध्ये हा निधी जमा करण्याबाबत सवलत देण्याचा ठराव समितीने पारित केला.