शिष्यवृतीचे खाते गोठविले
By admin | Published: July 12, 2014 11:54 PM2014-07-12T23:54:08+5:302014-07-12T23:54:08+5:30
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होवू नये यासाठी,
राष्ट्रीयीकृत बँकांची हेकेखोरी : जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न
रुपेश उत्तरवार - यवतमाळ
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होवू नये यासाठी, रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश होते. यानुसार विद्यार्थ्यांनी झिरोे बॅलेंसवर काढलेले खाते राष्ट्रीयीकृत बँकांनी गोठविले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अडचणीत सापडला आहे.
शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाने शिष्यवृत्ती जाहीर केली. यामध्ये प्रत्येक घटकांचा विचार करण्यात आला. शिष्यवृत्तीचे वाटप करताना कुठेही गैरप्रकार होऊ नये आणि व्यवस्थापनाकडून त्याचा केला जाऊ नये म्हणून थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्याच्या सूचना महाविद्यालयांनी केल्या.
विद्यार्थ्यांचे खाते झिरो बॅलेंसवर काढण्याच्या सूचना होेत्या. यासाठी प्रारंभी राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दिला. पाठपुराव्यानंतर बँका यासाठी तयार झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला. आता मात्र स्टेट बँकेने ही खाती गोठविली आहे. सहा महिन्यांपासून कुठलाच व्यवहार नसल्याचे कारण पुढे करीत खाते बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला. हा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पाठविण्यात आला असता बँकेत विद्यार्थ्यांचे खातेच नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे शिष्यवृत्ती द्यायची कशी हा गंभीर प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे. विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दोन कोटी ३० लाखांपेक्षा अधिक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र राष्ट्रीयीकृत बँकेच्या अफलातून निर्णयाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, बँकांच्या या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा मुख्याध्यापक कृती समिती अध्यक्ष विजय खरोडे यांनी दिला आहे.