जिल्ह्यातील शाळा समित्या राज्याला पथदर्शक
By admin | Published: September 15, 2015 05:08 AM2015-09-15T05:08:14+5:302015-09-15T05:08:14+5:30
शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळांमध्ये अपेक्षित सुसंवाद नसल्याने अनेक शालेय योजना ढेपाळतात. मात्र,
यवतमाळ : शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळांमध्ये अपेक्षित सुसंवाद नसल्याने अनेक शालेय योजना ढेपाळतात. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांनी उत्तम कामगिरी केली असून त्यांचे हे कार्य आता महाराष्ट्रभरातील शाळांना मार्गदर्शक ठरणार आहे. जिल्ह्यातील चार गावांतील शाळा समित्यांच्या माहिती पुस्तिेकत समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे एक माहिती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ज्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी शाळांसाठी चांगले उपक्रम राबविले, त्यांची माहिती या पुस्तिकेत एकत्रित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी (उमरखेड), जनुना (उमरखेड), कोठारी (महागाव), कृष्णापूर (यवतमाळ) या गावांतील शाळा व्यवस्थापन समितीच्या कामांचा त्यांत समावेश करण्यात येणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील या गावांचे काम महाराष्ट्रभरातील शाळा व्यवस्थापन समित्यांसाठी पथदर्शक ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढावी, यासाठी ढाणकी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी स्वत:च्या ट्रॅक्टरवर जाहिराती लावून मिरवणुका काढली होती. कृष्णापूरच्या व्यवस्थापन समितीने मातांचा मेळावा घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आईचे मोल स्पष्ट केले. जनुनाच्या शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत सस्नेह भोजनाचा उपक्रम सरू केला. कोठारीच्या सदस्यांनी स्वत: वर्गात पेंटिंग्स काढून विद्यार्थ्यांच्या मनावर ज्ञानरचनावाद बिंबवण्याचा प्रयत्न केला. काही गावांतील समिती सदस्यांनी चक्क शिक्षक रजेवर असताना अध्यापनाचे कामही बजावले. तर काही ठिकाणच्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळेत कॉन्व्हेंट सुरू करून दाखविले आहे. अशी कामे महाराष्ट्रभरातील समित्यांनीही करून दाखवावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रयत्न चालविले आहे. त्याच हेतूने मंगळवारपासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुणे येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांसाठी मार्गदर्शक पुस्तिकेसह इतरही माहितीपर साहित्य या दोन दिवसीय प्रशिक्षणात तयार करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
ढाणकीचे शिक्षक करणार प्रेझेंटेशन
४यवतमाळ जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन समित्यांची माहिती महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी ढाणकी (उमरखेड) येथील शिक्षक शफी अजीस शेख यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निवड केली आहे. विशेष म्हणजे संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाच समावेश असलेल्या या प्रशिक्षणात केवळ ७ शिक्षकांचा समावेश आहे. त्यात संपूर्ण विदर्भातून शफी अजीस शेख हे एकमेव आहे. जिल्ह्यातील समित्यांच्या कामांबाबत ते या प्रशिक्षणात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करणार आहेत.