सभापतींच्या दालनात भरली शाळा
By admin | Published: August 3, 2016 01:31 AM2016-08-03T01:31:52+5:302016-08-03T01:31:52+5:30
दारूच्या नशेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिंदोला (माईन्स) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ..
मद्यपी शिक्षकाविरूद्ध रोष : शिंदोला येथील पालकांचा पंचायत समितीत ठिय्या
वणी : दारूच्या नशेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिंदोला (माईन्स) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत एका विक्षिप्त शिक्षकाच्या विरोधात पालकांनी मंगळवारी विद्यार्थ्यांसह येथील पंचायत समितीवर धडक दिली. जोपर्यंत सदर मद्यपी शिक्षकाची बदली करून त्या ठिकाणी महिला शिक्षिका देण्यात येणार नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत पालकांच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने विद्यार्थी पंचायती समितीचे सभापती सुधाकर गोरे यांच्या दालनात ठिय्या देऊन होते.
पुरूषोत्तम देवतळे असे मद्यपी शिक्षकाचे नाव आहे. शिंदोला (माईन्स) येथे वर्ग एक ते सातवीपर्यंत शाळा असून या शाळेत गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत चार शिक्षकांची गरज असताना वर्तमान स्थितीत पुरूषोत्तम देवतळेसह तिनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यात देवतळे हे सकाळपासूनच मद्याच्या नशेत तर्र राहत असल्याने उर्वरित दोनच शिक्षकांना अध्यापनाचे कार्य करावे लागत आहे. त्याच्या परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. मागील एक वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांकडून शिक्षक देवतळेच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. मात्र अद्यापही शिक्षकाच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात आली नाही. कारवाई होत नसल्याने देवतळेची मग्रुरी वाढली असून बदली झाल्यास गावातील महिलांना खोट्या तक्रारीत अडकविण्याच्या धमक्या देवतळेच्या कुटुंबाकडून मिळत असल्याचे पालक व शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेकदा तक्रारी करूनही शिक्षक पुरूषोत्तम देवतळेची बदली होत नसल्याने संतप्त पालक आपल्या पाल्यांसह मंगळवारी सायंकाळी वणी पंचायत समितीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत शिंदोलाचे सरपंच तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शाळा समितीचे अध्यक्ष सिनू गुरंबार, कांचन हंसकर होते. यावेळी पालकांनी पंचायत समितीचे सभापती सुधाकर गोरे यांच्या समवेत चर्चा केली. त्यावर गोरे यांनी पुरूषोत्तम देवतळे याची बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी तातडीने नवीन शिक्षक पाठविण्याची कारवाई करण्यात आल्याचे पालकांना सांगितले. मात्र शाळेत मुलींची संख्या अधिक असल्याने महिला शिक्षिकेसह आणखी एक शिक्षक द्या, अशी मागणी पालकांनी केली. सायंकाळी उशिरापर्यंत या मागणीवर तोडगा निघाला नव्हता. अनेकदा तक्रारी करूनही शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षक देवतळेला पाठिशी घालत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला. दरम्यान, सभापती गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दालनात बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. (कार्यालय प्रतिनिधी)
नृत्यशौैकीन शिक्षक
मद्यपी शिक्षक पुरूषोत्तम देवतळे याच्या विक्षिप्त वर्तनाचा पाढाच विद्यार्थीनींनी सभापती सुधाकर गोरे यांच्यापुढे वाचला. खाली बसण्याच्या तरटपट्टया साडीसारख्या नेसायला लावून गुरूजी आम्हाला वर्गातच नृत्य करायला लावतात. अश्लिल आणि घाणेरड्या शब्दात आमच्याशी बोलतात, अशी माहिती विद्यार्थींनीनी गोरे यांना यावेळी दिली.