शिक्षकांचीच भरली शाळा
By admin | Published: September 4, 2016 12:46 AM2016-09-04T00:46:25+5:302016-09-04T00:46:25+5:30
येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शनिवारी चक्क शिक्षकांचीच शाळा भरल्याचे चित्र दिसून आले.
शिक्षणाधिकारी कार्यालय : समायोजनात १२४ शिक्षकांना मिळाली नियुक्ती
यवतमाळ : येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शनिवारी चक्क शिक्षकांचीच शाळा भरल्याचे चित्र दिसून आले. समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांसह मुख्याध्यापकांनाही पाचारण करण्यात आल्याने अक्षरश: जत्राच भरली होती.
जिल्ह्यात संचमान्यतेनुसार १२४ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आत्तापर्यंत रखडली होती. अनेकदा समयोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांना पाचारण करण्याबाबतचे संदेश सतत फिरत होते. मात्र प्रत्येकदा ऐनवेळी समायोजनाच्या तारखेत बदल होत होता. यामुळे अतिरिक्त शिक्षक अक्षरश: भंडावून गेले होते. सुरुवातीला २० आॅगस्टपर्यंत अतिरिक्त शिक्षक व रिक्त जागांची यादी अपडेट झाल्याने २४ व २५ आॅगस्टला समायोजन करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले होते.
या महितीने अतिरिक्त शिक्षकांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र ऐनवेळी तांत्रिक कारण पुढे करून हे समायोजन रद्द करण्यात आले होते. त्यानंतर शिक्षक व शिक्षण संस्थांना यादीवर सूचना व हरकती घेण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार १२ शिक्षकांनी यादीवर आक्षेप घेतले. त्यांच्या आक्षेपानुसार पुन्हा यादी तयार करण्यात आली. नंतर ३० व ३१ आॅगस्टला समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त शिक्षक व संबंधित मुख्याध्यापकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते.
या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा समायोजन रद्द करण्यात आल्याचा संदेश संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांना पाठविण्यात आला. अखेर शनिवारी, ३ सप्टेंबरला समायोजनाची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी अतिरिक्त शिक्षक व मुख्याध्यापकांना पाचारण करण्यात आले. परिणामी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयालाच चक्क शाळेचे रूप प्राप्त झाले होते. या कार्यालयाच्या परिसरात सर्वत्र वाहनांची गर्दी झाली होती. प्रांगणात पेन्डॉलही टाकण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)