बनावट नियुक्तीपत्र घेऊन ‘तो’ पोहोचला शाळेत
By admin | Published: August 3, 2016 01:27 AM2016-08-03T01:27:08+5:302016-08-03T01:27:08+5:30
शिपाई पदाचे बनावट नियुक्ती पत्र घेऊन एका विद्यालयात पोहोचलेल्या तरुणाचे पितळ
पितळ उघडे : वडगाव रोड ठाण्यात गुन्हा दाखल
यवतमाळ : शिपाई पदाचे बनावट नियुक्ती पत्र घेऊन एका विद्यालयात पोहोचलेल्या तरुणाचे पितळ मुख्याध्यापकाच्या सतर्कतेने पांढरकवडा येथे उघडकीस आले. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पांढरकवडा येथील केईएस विद्यालयात टिकाराम पुरुषोत्तम हरडे हा तरुण शिपायाचे नियुक्ती पत्र घेऊन रुजू होण्यासाठी २३ जुलै रोजी पोहोचला. त्या ठिकाणी त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे जावक क्रमांक आणि स्वाक्षरी असलेले नियुक्ती पत्र सादर केले. मात्र हा प्रकार मुख्याध्यापकांच्या लक्षात आला. कारण खासगी संस्थेत एखाद्याची नियुक्ती करण्यासाठी सर्व प्रथम संस्थेकडून शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. त्याप्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच नियुक्ती केली जाते. परंतु हा तरुण थेट नियुक्ती पत्र घेऊनच आला होता. त्यामुळे मुख्याध्यापकांनी ही बाब माध्यशिक्षक शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र पाहिले असता त्यावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी चौकशी केली. त्यानंतर वडगाव रोड पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी तक्रार दिली. त्यावरून सदर तरुणाविरुद्ध फसवणूक, खोटे दस्तावेज तयार करून त्याचा वापर करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला. हा तरुण नेमका कोणत्या गावचा आहे, हे मात्र कळू शकले नाही. त्याला कुणी पैसे घेऊन असे नियुक्ती पत्र तर दिले नाही ना याचाही तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)