जिल्हाधिकारी कार्यालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:21 PM2018-09-26T23:21:45+5:302018-09-26T23:22:35+5:30
येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षकाची तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षकाची तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या विद्यालयाला तातडीने शिक्षक द्यावे, या मागणीसाठी बुधवारी केंद्रीय विद्यालयाच्या पालक कृती समितीने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले. त्यानंतर येथील तिरंगा चौकात काही काळ धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे पालकांनी सादर केले.
केंद्रीय विद्यालयात शिक्षकांची २६ पदे मंजूर आहेत. यातील १२ पदे नियमित भरलेली आहेत. तर ११ पदे रिक्त आहेत. यामुळे विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या विषयाला शिकविण्यासाठी शिक्षकच नाही. यानंतरही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहेत. रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. केंद्रीय विद्यालयाची नवीन इमारत उभारण्यात यावी, ही मागणीसुद्धा प्रकर्षाने पालक कृती समितीने आपल्या निवेदनात रेटली आहे. मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी केंद्रीय विद्यालयाच्या पालक कृती समितीचे अमन निर्बाण, प्रवीण पांडे, अजय देशमुख, सतीश माने, सुरेश बोनगिरवार, नितीन कोल्हे, सचिन व्यास, सचिन जयस्वाल, रवींद्र राऊत यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.