आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...!

By अविनाश साबापुरे | Published: December 19, 2023 05:05 PM2023-12-19T17:05:20+5:302023-12-19T17:07:07+5:30

शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते.

school train reaches home of sick children | आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...!

आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...!

यवतमाळ : आजारांवर सर्वांत मोठे औषध असते आपल्या माणसांकडून होणारी विचारपूस. खेड्यापाड्यात तर आजारी पडणाऱ्या मुलांना खरे औषधही मिळणे दुरापास्त, मग असे आपुलकीचे औषध कुठून मिळणार? पण कळंब तालुक्यातील सुकळी गावात मात्र आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी मंगळवारी थेट शाळेची आगगाडी धडकली. अख्या शाळेने आजारी दोस्तांची विचारपूस केली अन् बिस्कीटचा पुडा देत ‘गेट वेल सून’ म्हणून शुभेच्छांचे औषधही दिले.

सुकळी जिल्हा परिषद शाळेने शाळेची दैनंदिन उपस्थिती शंभर टक्के ठेवण्यासाठी ‘आगगाडी’चा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सकाळी काही विद्यार्थी शाळेत पोहोचले की, ते एकमेकांचा हात धरून ‘आगगाडी’ तयार करतात. मग ही आगगाडी गावभर फिरून एकेका विद्यार्थ्याच्या घरी पोहोचते. प्रत्येक घरातील विद्यार्थ्याला ‘नवा डबा’ म्हणून आगगाडीला जोडून घेतले जाते व गाडी पुढच्या दोस्ताच्या घरी जाते. शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते. पण याच उपक्रमाचा आणखी एक उपयोग सध्या सुरू झाला आहे.

सध्या थंडी वाढल्याने अनेक मुले आजारी पडत आहेत. मंगळवारी ही आगगाडी शाळेत आली, तेव्हा शिक्षकांना दोन विद्यार्थी गैरहजर आढळले. दुसऱ्या वर्गातला धनंजय सतीश जाधव आणि चौथीतली इशिका गणेश धोटे हे दोघे आजारी असल्याचे कळले. मग ही अख्खी ‘आगगाडी’ शिक्षकांना सोबत घेऊन त्या आजारी विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचली. सारे दोस्त आणि शिक्षक यांनी आजारी विद्यार्थ्यांची आस्थेवाईक विचारपूस केली. त्यांच्या आईबाबांसोबतही संवाद साधला. आजारी धनंजय व इशिकाला बिस्कीट पुडा देऊन सर्व मुले म्हणाली, ‘गेट वेल सून’! या छोट्याशा भेटीने आजारी मुलांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

येथील मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि तंत्रस्नेही शिक्षक संदीप कोल्हे यांनी असे वेगवेगळे उपक्रम येथे सुरू केलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अडचणींना काहीच कमतरता नसते. पण काम करणाऱ्यांना अडचणींवर कल्पकतेतून मात करता येते. याचेच ही शाळा उदाहरण ठरली आहे.


शाळेत मुलांच्या अनुपस्थितीची अनेक कारणे असतात. त्यापैकी एक म्हणजे मुलांचे आजारपण. आजारपणात मुलांना शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी भेटल्या, त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली तर आजारातून लवकर बरे होण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. शाळेतील आनंदी व खेळकर वातावरण मुलांना खुणावते. म्हणून आमच्या आगगाडीचा खूप उपयोग आहे.
- संदीप कोल्हे, शिक्षक, सुकळी

Web Title: school train reaches home of sick children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.