सोमवारपासून पुन्हा गजबजणार शाळा
By यदू जोशी | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:11+5:30
गुरुवारपासूनच सर्व शाळा स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळा सुरू झाल्यावर एखाद्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तेथील शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद करून तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावी व सर्वांची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ज्या गावात सध्या एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही, अशा ठिकाणी शासन निर्देशाप्रमाणे शाळा सुरू करण्यात याव्या, मात्र शाळा सुरू करताना सर्व खासगी व शासकीय शाळांनी कोविड अनुषंगाने शासन निर्देशाचे परिपूर्ण पालन करणे आवश्यक राहील, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी दिल्या.
ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करणेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल भवन येथे आढावा सभा घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुडधे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, प्रशासन अधिकारी नीता गावंडे, विस्तार अधिकारी डॉ. किशोरी जोशी, शिल्पा पोलपल्लीवार, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वासुदेव डायरे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक हाते, आरोग्य अधिकारी विजय अग्रवाल उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिपाई, बसचालक यांचेसह १०० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक असल्याचे व ते वरिष्ठांकडून प्रमाणिक करून घेण्याचे, तसेच त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण बंधनकारक राहील, असे सांगितले. पालकांनीदेखील दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाचा प्रसार कमी होईल. यास्तव पालकांना लसीकरणाचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने करावे, असे सांगितले. तसेच गुरुवारपासूनच सर्व शाळा स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळा सुरू झाल्यावर एखाद्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तेथील शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद करून तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावी व सर्वांची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसत आहे.
सव्वातीन लाख विद्यार्थी घेणार मोकळा श्वास
ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग दिनांक ४ ऑक्टोबरपासून सुरू करावयाचे आहेत. जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच वर्ग असणाऱ्या ग्रामीण भागात ५२१ शाळा असून, शहरी भागात २५७ अशा एकूण ७७८ शाळा आहेत. यात ३ लाख १५ हजार १७३ विद्यार्थी व ८३८४ शिक्षक असल्याची माहिती विस्तार अधिकारी डॉ. किशोरी जोशी यांनी दिली.
१८ महिने होते टाळे
कोरोना प्रादुर्भावामुळे बंद झालेले शाळेचे दरवाजे आता तब्बल १८ महिन्यानंतर सोमवारी उघडणार आहेत. यासाठीची पूर्वतयारी बहुतांश शाळांनी पूर्ण केली आहे. शिक्षकांनीही दोन्ही डोस घेतलेले आहेत.
अधिकाऱ्यांच्या सूचना
सोमवारी शाळा सुरू होणार असली तरी यापूर्वीच राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी व्हीडीओ काॅन्फरन्सद्वारे शाळा सुरू करताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबतच्या सूचना शाळा प्रशासनाला दिल्या आहेत.