सर्वांगसुंदर इमारतीत विद्यार्थिनींचा कोंडमारा

By admin | Published: July 18, 2014 12:21 AM2014-07-18T00:21:32+5:302014-07-18T00:21:32+5:30

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने तालुक्यातील मरसूळ येथे सुरू असलेल्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

Schoolgirls at Surya Sundasurda Building | सर्वांगसुंदर इमारतीत विद्यार्थिनींचा कोंडमारा

सर्वांगसुंदर इमारतीत विद्यार्थिनींचा कोंडमारा

Next

मरसूळची निवासी शाळा : अंधाराचे साम्राज्य आणि पाण्यासाठी पायपीट
उमरखेड (कुपटी) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने तालुक्यातील मरसूळ येथे सुरू असलेल्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. दोन वर्षांपासून महिला अधीक्षक नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशातच विद्यार्थ्यांना रात्री अंधारात राहण्याची वेळ येते. शिक्षकांची पदेही रिक्त असून या प्रकाराकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने पुसद-उमरखेड मार्गावर मरसूळ येथे शाळा बांधण्यात आली. चार कोटी ४० लाख रुपये खर्च करून इमारत बांधली. दोन वर्षांपासून ही शाळा सुरू झाली असून सहावी ते दहावीपर्यंत मुलींच्या निवासासह शिक्षणाची व्यवस्था केली आहे. १६६ मुली येथे शिक्षण घेत आहेत. परंतु येथे महिला अधीक्षकच नाही. त्यामुळे येथील कारभार शिपाई असलेल्या दोेन महिलांना सांभाळावा लागतो. आळीपाळीने त्या हे काम पाहत आहे. दिवसभर शाळेत आणि रात्री अधीक्षक म्हणून ड्यूटी करावी लागते. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
येथे मुख्याध्यापकासह चार शिक्षक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तीन शिक्षकांचे पद रिक्त आहे. त्यामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसानासोबतच असुविधांचा सामनाही मुलींना करावा लागतो. पिण्याचे पाण्याची कोणतीही सुविधा नाही. उमरखेडवरून एका खासगी टँकरने पाणी पुरविले जाते. दुषित पाण्यामुळे मुलींचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळेत रात्री-बेरात्री आजारी पडल्यास उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात आणले जाते. परंतु त्याठिकाणी प्रथमोपचाराची कोणतीही सुविधा नाही. शाळेच्या परिसरात वीज खांब उभारले आहे. परंतु तेही रात्री बंद असतात. गावापासून लांब अंतरावर असलेल्या या शाळेत अंधारात मुली जीव मुठीत घेऊन राहतात.
दर्जेदार शिक्षण मिळेल या आशेने आलेल्या अनुसूचित जातीच्या मुली याठिकाणी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे. या सर्व प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नाही. दरम्यान पाण्याच्या विषया संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी शेख सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता जीवन प्राधिकरणाने पाण्याची व्यवस्था करावी म्हणून बांधकाम विभागाने पैसे भरले आहे. तसेच पथदिवे लवकरच लावले जातील. सर्व सुविधा तत्काळ पूर्ण केल्या जाईल, असे शेख सत्तार यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Schoolgirls at Surya Sundasurda Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.