शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा
By admin | Published: April 30, 2017 01:16 AM2017-04-30T01:16:04+5:302017-04-30T01:16:04+5:30
समाजातील गोरगरिब, वंचितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी क्रांतिज्योती महिला संस्था गेल्या आठ वर्षांपासून धडपडत आहे.
मोफत शिक्षण : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी धडपड
यवतमाळ : समाजातील गोरगरिब, वंचितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी क्रांतिज्योती महिला संस्था गेल्या आठ वर्षांपासून धडपडत आहे. आता येत्या शैक्षणिक सत्रापासून आपल्या निवासी शाळेत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी माहिती संस्थेच्या संचालिका कांचन वीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
क्रांतिज्योती महिला बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रातर्फे २००९ पासून दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी येथे आश्रमशाळा चालविली जाते. सामाजिक कार्यकर्त्या कांचन वीर यांनी पदरमोड करून ही शाळा चालविली आहे. शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. मात्र शिक्षणाशिवायही शेतकऱ्यांच्या मुलांच्या अनेक मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्याकरिता निवासी स्वरूपाची शाळा आवश्यक आहे. त्यामुळेच आता आपल्या संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण व निवासाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे कांचन वीर यांनी सांगितले.
नेर येथील तंबाखे नगरात ही शाळा सुरू होत आहे. शाळेच्या जागेसाठी कांचन वीर यांना स्वत:ची पाच एकर शेती विकावी लागली. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता ही समाजसेवा आपण करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील गरजू आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांची यादी तहसील प्रशासनाकडून आपण घेणार असून, त्यांना शाळेत प्रवेश देणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या उपक्रमासाठी दानशुरांनी मदत देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
(स्थानिक प्रतिनिधी)