‘जी २० समिट’साठी १५ दिवस आधीच उघडल्या शाळा
By अविनाश साबापुरे | Published: June 5, 2023 06:35 AM2023-06-05T06:35:14+5:302023-06-05T06:36:10+5:30
राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्या तरी १५ दिवस आधीपासूनच शाळा भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्या तरी १५ दिवस आधीपासूनच शाळा भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. पायाभूत विकासाच्या अनुषंगाने पुण्यात ‘जी-२० समिट’ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळांमध्ये ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान’ या विषयावर रोज विविध उपक्रम राबविण्याचे आदेश एससीईआरटीने दिले आहेत.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार येत्या २०२७ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करून द्यायचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळेच लोकसहभागातून रोज शाळेमध्ये उपक्रम राबविण्याचे आदेश आहेत. सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये १ ते १५ जूनपर्यंत हे उपक्रम राबवायचे आहेत. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, लोकप्रतिनिधी यांना बोलावून विविध कार्यक्रम आयोजित करायचे आहेत.
...असे असतील उपक्रम
उन्हाळी शिबिर, पालक, शिक्षक सभा, शैक्षणिक खेळ, साक्षरतेबाबत जनजागृती, गप्पागोष्टींचा कट्टा, आदी उपक्रम १५ दिवस राबविल्यानंतर शाळापूर्व तयारी मेळावा घेणे, विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढणे, असे वेळापत्रक एससीईआरटीकडून जाहीर करण्यात आले आहे.