ऑनलाईन कामात शाळा माघारल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 03:21 PM2019-05-08T15:21:28+5:302019-05-08T15:23:09+5:30
शालेयस्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी प्रत्येक शाळेची इत्यंभूत माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्याचे आदेश आहे. मात्र महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी अद्याप ५० टक्के शाळांनीही माहिती भरलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शालेयस्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी प्रत्येक शाळेची इत्यंभूत माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्याचे आदेश आहे. मात्र महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी अद्याप ५० टक्के शाळांनीही माहिती भरलेली नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षातील योजनांची अंमलबजावणी रखडण्याची शक्यता आहे.
समग्र शिक्षा अभियानातून शाळांसाठी विविध लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के निधी वर्षाच्या सुरुवातीलाच दिला जातो. आजपर्यंत यू-डायसवरील विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या गृहीत धरून योजनांसाठी निधी पुरविला जात होता. मात्र आता या योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी यू-डायस प्लस हे अद्ययावत पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यावर पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक शाळेने माहिती भरण्याचे आदेश आहे. त्यासाठी १५ मे ही अंतिम मुदत असतानाही एक लाख दहा हजार १८९ शाळांपैकी आतापर्यंत केवळ तीन हजार ८५९ शाळांची माहिती प्रमाणित करण्यात आली आहे. तर ५३ हजार ३६७ शाळांनी माहिती भरलेली आहे. शिवाय १५ हजार शाळांनी जेमतेम माहिती भरण्यासाठी लॉगइन केले आहे. येत्या आठ दिवसात ५० हजारांपेक्षा अधिक शाळांनी माहिती न भरल्यास गणवेशासह मोफत पाठ्यपुस्तकांच्या योजनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील शाळांची पिछेहाट
विदर्भातील बहुतांश शाळांनी यू-डायस प्लसकडे दुर्लक्ष केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३३५४ शाळांपैकी केवळ १५२ शाळांनी या पोर्टलवर माहिती प्रमाणित केली आहे. तर वाशिम जिल्ह्यात १३९९ शाळा असताना केवळ २८, वर्धा १५१९ शाळा असताना केवळ १२, नागपूर ४१११ शाळा असताना केवळ सात शाळांनी पोर्टलवर माहिती प्रमाणित केली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यात १६७९ शाळा असून फक्त सहा तर गडचिरोली जिल्ह्यात २०८३ पैकी केवळ ४२ शाळांनी माहिती प्रमाणित केली. चंद्रपूर जिल्ह्यात २५२६ पैकी ६९, बुलडाणा जिल्ह्यात २४६७ पैकी ३२, भंडारा जिल्ह्यात १३१४ पैकी ५६, अमरावती जिल्ह्यात २८९७ पैकी १७६, अकोला जिल्ह्यात १८७८ शाळा असताना केवळ ९८ शाळांची माहिती आतापर्यंत प्रमाणित होऊ शकलेली आहे.