शाळा पुन्हा झाल्या ‘जिवंत’; पाखरांचा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:00 AM2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:00:36+5:30
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ९० टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळली. दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे मंडळी अत्यंत उत्साहात शाळेत आल्याचे पहायला मिळाले. मात्र शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तब्बल दोन वर्षांपासून पोरांविना पोरक्या आणि ओक्याबोक्या भासणाऱ्या शाळा बुधवारी पहिल्यांदाच पुन्हा गजबजल्या. पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाल्याने बुधवारी दिवसभर या शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शंभर टक्के शाळा उत्साहात सुरू झाल्या तर यवतमाळ शहरातील काही शाळांनी आणखी काही दिवस ‘थांबण्याची’ भूमिका घेतली.
विशेषत: जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या सर्वच शाळा सुरू झाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, दीपक चवणे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, योगेश डाफ यासह शिक्षण विभागातील सर्वच अधिकाऱ्यांनी सकाळपासून शाळा भेटी सुरू केल्या. सीईओंनी तर पहूर नस्करी येथील विद्यार्थ्यांची वाचन परीक्षा घेऊन बक्षिसेही दिली.
गणवेशासाठी आले साडेचार कोटी रुपये
- बुधवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने विविध शाळांमध्ये पहिल्या, दुसरीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
- पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. गणवेशासाठी जिल्ह्यात चार कोटी ६२ लाख दहा हजार २०० रुपयांचा निधी आला आहे. यातून ९० हजार ७८२ मुली अनुसूचित जातीची दहा हजार २४९ मुले, अनुसूचित जमातीची २० हजार ८६० मुले आणि बीपीएलमधील ३२ हजार १४३ मुलांना गणवेश मिळणार आहे.
- अकोलाबाजार, तरोडा, पहूर नस्करी येथील शाळांमध्ये सीईओ श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, बीडीओ जयश्री वाघमारे, बीईओ किशोर रावते, डाॅ. श्याम शिंदे, केंद्र प्रमुख राजू परमार, सरपंच अतुल देठे, विलास खरतडे, दिलीप शिंदे, सुनील देवतळे, सतीश मुस्कंदे, बबीता बारले, राधा जाधव, आसाराम चव्हाण यांनी वृक्षारोपण केले. वडसद येथे मिरवणूक निघाली.
शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह
- कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट सध्या भीती पसरवित असला तरी बुधवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात एन्ट्री केली. शिक्षण विभागानेही त्यांचे तेवढ्याच आत्मीयतेने स्वागत केले. उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ९० टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळली. दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे मंडळी अत्यंत उत्साहात शाळेत आल्याचे पहायला मिळाले. मात्र शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले होते. विविध पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शाळा भेटी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी
नगरपालिकांच्या शाळेतही विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी शालेय साहित्य वाटपासोबत विद्यार्थ्यांचे तापमानही तपासण्यात आले.
- राजेंद्र वाघमारे
मुख्याध्यापक, दिग्रस
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू झाल्याने शिक्षक आणि पालकही सुखावले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वांनी बुधवारी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
- गजानन पोयाम
शिक्षक, दाभा